उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यासाठी क्रीडा संकूलात आंतरराष्ट्रीय सुविधा - पालकमंत्री मदन येरावार






Ø सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण व विविध कामांचे भुमिपूजन
यवतमाळ दि. 12 : जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांनी आणि मार्गदर्शकांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही खेळांना जिवंत ठेवले आहे. आजही ते खेळाडूंना घडविण्याचे कार्य करीत आहे. येथील खेळाडूंमध्ये चांगली प्रतिभा आहे. त्यांना बळ दिले तर नक्कीच ते सुमार कामगिरी करू शकतात. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यासाठी येथील जिल्हा क्रीडा संकूलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण निधी आणि जिल्हा खनीज प्रतिष्ठान निधी अंतर्गत जिल्हा क्रीडा संकूल येथे तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण आणि विकास कामांचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रतिभा देशमुख, सा.बा.विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते.
खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, निरोगी मन व सुदृढ शरीर ठेवायचे असेल तर प्रत्येकाने मैदानावर खेळलेच पाहिजे. जिल्ह्यातील क्रीडा संकूल आमदार असतांना 1995 मध्ये बांधण्यात आले. आता काळानुरूप सर्वच बाबतीत बदल घडत आहे. क्रीडा क्षेत्रसुध्दा बदलले आहे. त्यामुळे खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांपासून वंचित राहावे लागू नये म्हणून येथे 17 कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि 10 कोटींच्या कामांचे भुमिपूजन करण्यात आले. वर्षानुवर्षे प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक येथे आहेत. त्यांच्या हातून घडणारे खेळाडूंनी या सोयीसुविधांचा लाभ घेऊन क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन त्यांनी केले. येथे प्रत्येक गोष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञ बोलाविले. सिंथेटिक ट्रॅकचे मार्गदर्शन करण्यासाठी चीन येथून दोन विशेषज्ञ आले. तसेच वेगवेगळ्या इमारतींकरीता व खेळांकरीता वेगवेगळे विशेषज्ञ देण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, यवतमाळच्या क्रीडा इतिहासात हा सुवर्णक्षण आहे. जवळपास 10 कोटींच्या अतिशय उच्च दर्जाच्या सुविधा येथे देण्यात आल्या आहेत. आजच्या युगात क्रीडा प्रकार मागे पडत आहे. युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोबाईलचा वापर वाढल्यामुळे जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आदी समस्यांचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. यावर मात करायची असेल तर नियमित खेळून घाम गाळणे हाच एकमेव उपाय आहे. खेळाचे विशेष महत्व लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने येथे आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांचा क्रीडापटूंनी तसेच युवक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसंचालक डॉ. प्रतिभा देशमुख यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आशियाई ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेकरीता जिल्ह्यातील आरोही भगत व प्रिती कांबळे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनिषा आकरे यांच्याकडे खेळाडूंसाठी 40 हॉकीस्टिक भेट देण्यात आल्या. यावेळी चिनी विशेषज्ञ किम जोंग व नील यांच्यासह कंत्राटदार राजेश शर्मा, सा.बा. विभागाचे उपअभियंता प्रवीण कुलकर्णी यांचासुध्दा मान्यवरांनी सत्कार केला.


क्रीडा संकूलात अशा आहेत सुविधा
वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत क्रीडा संकूलातील कामासाठी 6.83 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय ॲथेलिटीक्स फेडरेशन (आयएएएफ) च्या मानकानुसार 400 मीटर लांबीचा सिंथेटीक धावपथ तयार करणे. फुटबॉल मैदानाची निर्मिती करून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे (आयएएएफ) सर्टिफीकेट आर्टिफिसिएल टर्फ लॉन, धावपथ व फुटबॉल मैदानाच्या बाजूस काँक्रीट गटारे बांधणे, मैदानावर पाणी शिंपडण्याकरीता स्प्रिंकलर व पाईपलाईनची तरतुद तसेच पाणी निचरा होणारी उच्च प्रतिची यंत्रणा लावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ॲथेलेटीक्स फेडरेशन (आयएएएफ) च्या मानकानुसार विविध खेळांसाठी आवश्यक बाबींची तरतुद करण्यात आली आहे. सदर काम एकूण 9 महिन्यात पूर्ण झाले असून देखभाल जिल्हा क्रीडा संकुल समिती करणार आहे, असे कार्यकारी अभियंता चंद्रकांम मरपल्लीकर यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडीयम येथील हॅन्डबॉल कोर्टला सिंथेटीक फ्लोरींग करणे (1.95 कोटी रुपये), टेबल टेनिस हॉलचे नुतनीकरण करणे (42 लक्ष रुपये), स्केटींग कोर्ट करीता सिंथेटीक फ्लोरींग करणे (37.43 लक्ष), प्रेक्षक गॅलरी करीता टेन्साईल रुफींग करणे (2.30 कोटी), प्रशासकीय इमारतीची सुधारणा करणे व मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे (90 लक्ष), परिसरातील होस्टेलची सुधारणा करणे (1.12 कोटी), मुख्य रस्त्याचे कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे (1.91 कोटी), आवारभिंतीचे बांधकाम करणे (45.59 लक्ष) आणि जिल्हा क्रीडा संकुल नेहरू येथील विविध खेळांच्या मैदानावर लाईट लावणे व पथदिवे लावणे (75 लक्ष रुपये) अशा एकूण 10 कोटी 20 लक्ष रुपयांच्या कामांचे भुमिपूजन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले. संचालन प्रा. अनंत पांडे यांनी तर आभार क्रीडा अधिकारी नरेश बुंदेले यांनी मानले. कार्यक्रमाला क्रीडारसिक, क्रीडा मार्गदर्शक, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी