निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिका-यांनी घेतला महसूल आणि पोलिस विभागाचा आढावा





यवतमाळ दि. 17 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महसूल आणि पोलिस विभागाचा आढावा नियोजन सभागृहात घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, येणा-या काळात अतिशय समन्वयाने काम करावे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक टीम म्हणून सर्वांनी उत्तम काम केले. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली. याच धर्तीवर आतासुध्दा महसूल, पोलिस आणि निवडणुकीशी संबंधित विभागाने गांभिर्याने काम करावे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करून प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावी. निवडणुकीदरम्यान विविध परवानग्या एकाच ठिकाणावरून देण्याचे नियोजन करावे. अप्रिय घटना घडविण्याचा प्रयत्न करणारे किंवा जात / जमात याचा आधार घेऊन नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कोठेही आढळल्यास अशा लोकांवर त्वरीत कार्यवाही करा. निवडणुकीत अवैधरित्या वापरला जाणारा पैसा, अवैध दारूची वाहतूक, शस्त्रात्रे वाहतूक आदींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या सिमेवर चेक पोस्ट लावा. निवडणूक विभागाच्या सुचनांचे पालन करून वेळेवर येणा-या सुचनांचीसुध्दा त्वरीत दखल घ्या, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार म्हणाले, पोलिस यंत्रणेने आपापल्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवावे. तसा अहवाल नियमित सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक घडामोडीचा अहवाल विशेष शाखेकडे पाठवावा. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांच्यासह सर्वांनी एकमेकांशी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना आदर्श आचार संहितेबाबत माहिती दिली. यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, खर्च विषयक बाबी, अवैध दारू, पैसा, शस्त्रास्त्रे वाहतूक प्रतिबंध आदी विषयांचा समावेश होता. बैठकीला संबंधित उपविभागीय अधिकारी, एसडीपीओ, तहसीलदार, ठाणेदार आदी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी