पालकमंत्र्याच्या पुढाकाराने अत्याधुनिक व वातानुकूलीत अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सेवेत





Ø प्रशासकीय अधिका-यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
यवतमाळ दि. 12 : स्पर्धेच्या युगात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सुविधा मिळाव्या, मार्गदर्शनाचे एक मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेली शहरातील एपीजे अब्दुल कलाम वातानुकूलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.
दारव्हा रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेजवळ असलेल्या या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, सा.बा.विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुलकर्णी, शाखा अभियंता अजय क्षिरसागर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशासकीय अधिकारी व्हावे, असे वाटते. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी कलेक्टर, सीईओ, एसपी किंवा यासारख्या मोठ्या पदांवर गेले तर जिल्ह्याचा नावलौकिक वाढेल. त्यामुळेच येथील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट अभ्यासिका देण्याचा मानस केला. या अत्यंत सुंदर अभ्यासिकेचे लोकार्पण करतांना एक वेगळाच आनंद वाटत असून तरुण पिढीला एक व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
देश-विदेशातील अभ्यासपूर्ण माहिती व ज्ञान येथील संगणकावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच येथे अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांनो आपण कॉपी करून केवळ पास होऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी मात्र परिश्रमच करावे लागतात. केवळ पदवी घेऊ नका. तर त्यात नैपुण्य प्राप्त करून आपल्यातील कौशल्य विकसीत करा. आजचे युग हे स्पर्धा परिक्षेचे आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करा. तसेच केवळ वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला प्राविण्यतेकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणे म्हणजे शिक्षण होय, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, प्रशासकीय अधिकारी किंवा मोठे पदावर जाण्याची विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही अभ्यासिका उभारली आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी यशस्वी अधिका-यांचे नियमित मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे. या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, ही अभ्यासिका जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अमुल्य भेट आहे. यामुळे जिल्ह्यातून नवीन अधिकारी मिळण्यास मदत होईल. पुस्तकांचे जीवनात विशेष महत्व आहे, त्यामुळे यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खुप मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अपर अधिक्षक नुरूल हसन म्हणाले, भविष्यातील शंभर वर्षांचा विचार करायचा असेल तर नवीन पिढी तयार करणे आवश्यक आहे. हे ओळखूनच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. आता या अभ्यासिकेचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे विद्यार्थ्यांच्या हाती आहे. अपयशपासून भिऊ नका, स्वत:चे भविष्य घडवा, असा यशचा कानमंत्र त्यांनी दिला.


अभ्यासिकेची वैशिष्टे
तळमजल्यावर 10 अंध विद्यार्थ्यांकरीता ब्रेललिपी व संगणकीय उपकरणाने परिपूर्ण व अद्यावत बाबींने सुसज्ज अभ्यासिका. पहिला मजल्यावर 50 विद्यार्थ्यांकरीता स्पर्धात्मक परीक्षा व इतर विषयाच्या अभ्यासासाठी अद्यावत प्रकाश योजनेसह सुसज्ज सेमीनार हॉल. आवारभिंत, कुपनलिका, अंतर्गत सजावट, बगीचा व फर्निचर इत्यादी बाबींचा समावेश आहे. संपूर्ण इमारत आंतरीक व बाह्य व्यवस्था सीसीटीव्ही च्या निगराणीत. पारंपारीक लायब्ररी व आधुनिक डिजीटल ई-लायब्ररी ची उपलब्धता. आर.ओ.वॉटर फिल्टर युक्त पाणीव्यवस्था व प्रसाधन गृहाची व्यवस्था. या अभ्यासिकेसाठी पाच कोटींचा खर्च आला असून 50 लाख रुपये पुस्तकांसाठी मंजूर करण्यात आले आहे.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते पायल नावेकर, रामकृष्ण राठोड, आकाश चव्हाण या विद्यार्थ्यांसह मोफत शिकवणी घेणारे नरेश उन्हाळे गुरुजी, आनंद गवई, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले निकेश भोयर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी तर संचालन सत्यपाल घाटे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी