बसपोर्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवाश्यांना उत्कृष्ट सुविधा देऊ - पालकमंत्री मदन येरावार





Ø यवतमाळ आगाराच्या बसस्थानकाचे भुमिपूजन
यवतमाळ दि. 12 : आजही ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी, वृध्द नागरिक परिवहन महामंडळाच्या बसची वाट बघतात. महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील रक्तवाहिनी आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी बांधण्यात येणारे बसस्थानक नाही तर बसपोर्ट राहील. एअरपोर्टच्या धर्तीवर जिल्ह्यातील प्रवाश्यांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यवतमाळ आगाराच्या बसस्थानकाचे भुमिपूजन करतांना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, अविनाश राजगुरे, आगारप्रमुख रमेश उईके, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या विभागाचा कायापालट केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कर्मचारी, प्रवाश्यांची सुरक्षितता, वेतनाचा प्रश्न आदी बाबी निकाली काढण्यात आल्या आहेत. 11 कोटींचे बसपोर्ट येथे मंजूर करण्यात आले असून 5 कोटी 27 लक्ष रुपये कळंब बसस्थानकाच्या नुतणीकरणासाठी मंजूर करण्यात आले आहे. या बसपोर्टमुळे यवतमाळच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बस ही शेवटच्या माणसांपर्यंत सेवा देणारी एकमेव वाहतूक व्यवस्था आहे. ग्रामीण भागात नागरिक रस्ता बांधण्याची मागणी करीत असतात. याचाच अर्थ या रस्त्यावरून गावापर्यंत बस येईल, असा विश्वास त्याला असतो.
येथे बनविण्यात येणारे बसपोर्ट हे अतिशय सुंदर आणि सुसज्ज राहणार आहे. नागरिकांच्या पैशातून ही इमारत साकारली जाणार आहे. त्यामुळे त्याची योग्य निगा राखणे, ही आपली जबाबदारी आहे. तयार होणारे बसपोर्ट हे माझे आहे, अशी भावना नागरिकांनी ठेवावी म्हणजे त्याची दुर्दशा होणार नाही. परिवहन विभागाने त्वरीत या बसस्थानकाचा ताबा द्यावा. ठराविक वेळेत हे बसपोर्ट तयार करून नागरिकांच्या सेवेत दाखल करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, यवतमाळच्या बसस्थानकाबद्दल प्रत्येक यवतमाळकरांना अभिमान आणि स्वाभिमान आहे. 1972 मध्ये येथे तयार झालेले बसस्थानक राज्यात सर्वात सुंदर होते. त्याचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी काळात तयार होणारे बसस्थानकसुध्दा अप्रतिम राहील. पालकमंत्री आणि मी वारंवार येथील बसस्थानकाबाबत परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. परिवहन मंत्र्यांनीही यवतमाळसोबतच नेर, दारव्हा, दिग्रस येथील बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. दिवाळीपर्यंत एक हजार नवीन बसेस सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच नवीन गाड्या दिसतील, असे संजय राठोड म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.


बसस्थानक पुर्नबांधणी व नुतनीकरण तसेच दर्जावाढीचे कामाची वैशिष्ट्ये
नवीन बसस्थानकाच्या कामाचा अंदाजित खर्च 10 कोटी 75 लक्ष रुपये असून कामाची मुदत 11 महिने आहे. पुर्नबांधणी, नुतणीकरण व दर्जावाढ कामांतर्गत यवतमाळ येथील सध्याचे बसस्थानक संपूर्णपणे

तोडून त्याजागी एकूण 20 फलाटांचे सुसज्ज बसस्थानक उभारण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये तळमजल्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता 1753 चौ.मी. इतके वाहनतळ उभारण्यात येत आहे. जमीन मजल्यावर 1825 चौ.मी. बांधकामाअंतर्गत 860 चौ.मी. इतक्या आकाराचे प्रशस्त प्रवासी प्रतिक्षालय, उपहारगृह, हिरकणी कक्ष, चौकशी व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, एकूण 7 दुकाने इत्यादी बांधकाम करण्यात येत आहे. तसेच पहिल्या मजल्यावर चालक, वाहक विश्रांतीगृह, रा.प.महिला कर्मचारी विश्रांतीगृह, मनोरंजन कक्ष, एस.टी.को. – ऑप बँक शाखा इत्यादीचे बांधकाम करण्यात येईल. संपूर्ण वाहनतळाचे काँक्रीटीकरण, नालासाईट कुंपनभिंतीच्या बाजूने वृक्षलागवड इत्यादी कामे करण्यात येत आहे.


तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी तर आभार आगारप्रमुख रमेश उईके यांनी मानले. यावेळी कंत्राटदार सुमीत बाजोरीया, नगरसेवक अजय राऊत, विजय खडसे, दिनेश चिंडाले, नितीन गिरी यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी