किटकनाशक फवारणीबाधित रुग्णांवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलप्रमाणे उपचार



v फवारणीबाधित 31 रुग्णांची नोंद, 15 जणांना डिस्चार्ज
यवतमाळ दि. 2 : किटकनाशक फवारणी बाधित रुग्णांवर योग्य आणि त्वरीत उपचार करण्यासाठी येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व सोयीयुक्त अद्ययावत वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच येथे दाखल झालेल्या फवारणीबाधित रुग्णावर राज्य शासनाने दिलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 31 फवारणीबाधित रुग्णांची नोंद झाली असून यातील 15 जणांना योग्य उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्या शेतमालावर किटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू झाला आहे. या दरम्यान शेतकरी / शेतमजुरांनी फवारणी करतांना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह कृषी आणि आरोग्य विभागाने केले आहे. मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे फवारणीबाधित रुग्ण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत आहे. या रुग्णांना त्वरीत उपचार मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासन काळजी घेत आहे.
रुग्णालयामध्ये किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांसाठी उपाययोजना व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व किटकनाशक फवारणी बाधीत रुग्ण औषधवैद्यकशास्त्र विभागांतर्गत दाखल करून घेण्यात येतात. सदर रुग्णांसाठी स्वतंत्र 10 खाटांचा अद्यावत सर्व सोईंनी युक्त वार्ड तयार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अतिदक्षता कक्षातील 5 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सदर रुग्णांसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून पथकातील विशेष तज्ज्ञ डॉक्टर सर्व विषबाधीत रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करतात. या पथकामध्ये एक सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक, एक वरिष्ठ निवासी व तीन कनिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत.
किटकनाशक फवारणी बाधीत रुग्ण दाखल होताच रुग्णाबाबत पोलीस विभागाला कळविण्यात येते व तशी नोंद घेण्यात येते. सर्व प्रकारचे यंत्र व उपकरणे या किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यात 10 व्हेंटीलेटर, 15 मल्टीपॅरामॉनिटर, डिफ्रीबीलेटर, सिरींज पंप, ऑक्सीजन, सक्शन मशीन आदींचा समावेश आहे. किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा सर्व प्रकारचा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये इंजेक्शन ॲट्रोपिन, इंजेक्शन पॅलीडॉक्झीम व सर्व प्रकारच्या अँटीबायोटिकचा समावेश आहे. किटकनाशक फवारणी बाधीत रूग्णांसाठी लागणाऱ्या रक्ताच्या चाचण्या, उदा. सिरम कोलीनइस्टरेज, एबीजी इत्यादी उपलब्ध केल्या आहेत. विषाचे स्वरूप जाणण्यासाठी गॅस्ट्रीक लवाजचे केमिकल ॲनालासीस करण्यात येते. किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांवर शासनाद्वारे दिलेल्या स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येतो. तसेच रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे समाजसेवा अधीक्षक व मनसोपचार तज्ञांकडून समुपदेशन करण्यात येते.
फवारणी बाधीत रुग्णांना सुट्टी झाल्यानंतर 7 दिवसांसाठी औषधोपचार देण्यात येतो. यामध्ये रुग्णांना विषबाधेचे लक्षणे आढळल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने उपचारास्तव जाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच पुढील 45 दिवस फवारणी न करण्याचे सांगण्यात येते. फवारणी बाधीत रुग्णांवर उपचाराबाबत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामधील सुमारे 130 डॉक्टरांनी हजेरी लावली होती. 13 ऑगस्ट 2019 पासून आतापर्यंत 31 किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांची नोंद या रुग्णालयात झाली असून यापैकी 15 रुग्ण आजघडीला रुग्णालयात भरती आहे. यापैकी एक रुग्ण व्हेंटीलेटरवर असून 4 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 15 जणांना योग्य उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी