साथरोगाविषयी व्यापक जनजागृती करा



v  जिल्हाधिका-यांचे आरोग्य विभागाला निर्देश
यवतमाळ दि.3 : सध्या सगळीकडे ‘करोना’ व्हायरसने थैमान घातले असून त्या धर्तीवर साथरोगाविषयी माध्यमांद्वारे व आरोग्य यंत्रणेद्वारे व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात एड्स प्रतिबंध व नियंत्रण, क्षयरोग, कुष्ठरोग व साथरोगावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. बाळासाहेब चव्हाण, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी श्री. बोरिकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. प्रशांत पवार, डॉ. मंजुषा चिंतलवार आदी उपस्थित होते.
            आपात परिस्थतीसाठी आरोग्य यत्रंणा 24 तास शीघ्र तपासणी पथकासह सज्ज असल्याचे व ‘करोना’ व्हायरसच्या रुग्णाकरीता वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्ष तयार केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे यांनी बैठकीत दिली. तत्पूर्वी जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण पथकाच्या प्रिती दास यांनी एड्स प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी क्षयरुग्णांच्या तपासणीची आणि जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुभाष केंद्रे यांनी ‘करोना’ व्हायरसपासून घ्यावयाची काळजी व यासंबधीच्या उपाययोजनेबाबत माहिती दिली.

‘करोना’ आजाराविषयी घ्यावयाची काळजी
‘करोना’ व्हायरस आजाराची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, खोकला, गंभीर स्वरूपाचे श्वसन संस्थेचे लक्षणे, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, पचनसंबंधी लक्षणे, अतिसार, मुत्रपिंड रिकामे होणे आदी लक्षणे आढळून येतात. लक्षणाचे स्वरूप पाहता हवेमार्फत प्रसार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सदर आजाराबद्दल नागरीकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर आजाराला प्रतिबंध म्हणून साबणाने व पाणी वापरून हात स्वच्छ धुणे, शिंकतांना व खोकलतांना नाकावर तोंडावर रुमाल धरणे, सर्दी व फ्ल्यू सदृष्य लोकांशी नजीकचा संपर्क टाळावा. मटन, मास व अंडी पूर्णपणे शिजवून व उकळून घ्यावे. जंगली अथवा पाळीव प्राण्याशी संपर्क टाळावा. वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास त्वरीत नजिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


०००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी