शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री संजय राठोड




v शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुभारंभ
यवतमाळ दि.08 : गरीब व गरजू लोकांना अत्यल्प दरात स्वादिष्ट जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरू केली आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर तीन ठिकाणी हे भोजन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वने, भुकंप पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री दुष्यंत चतुर्वेदी, इंद्रणील नाईक, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, सभापती विजय राठोड, राजेंद्र गायकवाड, शिल्पा देशमुख, श्रीधर मोहड, लता चंदेल, थाळी केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते.
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतांनाच शेतक-यांसाठी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व गरीब आणि गरजू व्यक्तिंच्या जेवणासाठी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना जेवणासाठी अधिक पैसे द्यावे लागत होते. त्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबावी, हे लक्षात घेऊन शिवभोजन थाळी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. यवतमाळ शहरात सद्यस्थितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक अशा तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 150 थाळींचे नियोजन करण्यात येणार असले तरी ही संख्या भविष्यात वाढू शकते. गर्दीच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येईल. शिवभोजन थाळीचा लाभ घेणारी जनता नक्कीच समाधान व्यक्त करेल, असे ते म्हणाले.
संपूर्ण राज्यात 26 जानेवारी रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. मात्र यवतमाळ जिल्ह्यात आचारसंहिता असल्यामुळे या योजनेचा शुभारंभ आज (दि. 8) करण्यात आला. 1995 मध्ये युती शासनाने एक रुपयात झुणका भाकर सुरू केली होती. बदलत्या काळानुसार शिवभोजन थाळी ही योजना राज्य शासनाने आणली आहे. लोककल्याणकारी, रयतेचे राज्य म्हणून नागरिक या सरकारकडे बघत आहे, असेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. संतोष झिंगे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व 150 लाभार्थ्यांचे पैसे स्वत: भरले. दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत ही थाळी उपलब्ध होणार आहे. यात दोन चपाती (प्रत्येकी 30 ग्रॅम), एक वाटी भाजी  (100 ग्रॅम), एक वाटी वरण (100 ग्रॅम) आणि भात (150 ग्रॅम) असे शिवभोजन थाळीचे स्वरुप आहे.
कार्यक्रमाचे संचालन एकनाथ बिजवे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. गुजर, डॉ. राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने रुग्णालयातील नागरिक उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी