तूर साठविण्यासाठी बाजार समितीचे व खाजगी गोदाम अधिग्रहीत करणार - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



v शेतक-यांना मिळणार दिलासा
यवतमाळ दि.28 : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत असून सध्या साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतक-यांना तूर खरेदीची वाट पाहावी लागत आहे. मात्र शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरीता अधिग्रहीत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून कापूस आणि तूरीचे उत्पादनसुध्दा चांगले झाले आहे. मात्र शेतक-यांचा माल साठविण्यासाठी गोदामांची कमतरता जाणवत आहे. राज्य वखार महामंडळांचे गोदाम अपुरे पडत असल्याने दोन-तीन दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तसेच खाजगी गोदाम अधिग्रहीत करण्यात येणार आहे. शेतक-यांचा माल लवकरात लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष देणार आहोत. दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात जवळपास 9 लक्ष 7 हजार हेक्टरवर खरीप आणि 87 हजार हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड करण्यात येते. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे चांगले उत्पादन येथे होते. तूरीचा हमीभाव 5800 रुपये असून हा हमीभाव मिळणे शेतक-यांचा अधिकार आहे. हमीभावापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील. शेतक-यांना कशी मदत करता येईल, याचा विचार करूनच संबंधित यंत्रणेला खाजगी व बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्वावर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर खाजगी गोदाम तपासून घेण्याच्या सुचनासुध्दा जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गोदामांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
बैठकीला सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक रमेश कटके, उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद