तहसील व पंचायत समिती कार्यालयाची इमारत मिनी मंत्रालयासारखी करा - पालकमंत्री संजय राठोड






Ø नेर येथील प्रशासकीय इमारतींच्या बांधकाची पाहणी
यवतमाळ, दि. 20 : शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क नेहमी तालुक्याशी येतो. शासकीय कामात अडचण जावू नये म्हणून नेर (नवाबपूर) येथे तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही इमारती मिनी मंत्रालयासारख्या सुसज्ज व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
नेर (नवाबपूर) येथे दोन्ही तहसील व पंचायत समिती प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, शाखा अभियंता भुपेश कथलकर, कंत्राटदार मनिष कासलीकर आदी उपस्थित होते.
नेर शहरातील दोन्ही इमारतींचे बांधकाम मजबुत करा, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, वीज बचतीकरीता इमारतींमध्ये सोलरची व्यवस्था करा. एक आगळी-वेगळी इमारत तयार करून लोकसेवेचे काम या इमारतींमधून झाले पाहिजे. सीसीटीव्ही, मोकळ्या जागेत सुशोभिकरण, राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो लावण्यासाठी जागा, पार्किंगची व्यवस्था आदी कामांचा या इमारतीच्या बांधकामामध्ये समावेश असला तरी ते काम दर्जेदार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
नेर शहरात तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत 9.53 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार असून यात तहसील कार्यालयाव्यतिरिक्त उपनिबंधक कार्यालय, वन विभाग, उप कोषागार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय आदींचा समावेश राहणार आहे. पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीकरीता 3.36 कोटी रुपये खर्च येणार आहे.
यावेळी मनोज नाले, जि.प.सदस्य भरत मसराम, प्रवीण राठोड, सुधाकर तायडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना धनादेश वाटप : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पांढरी येथील सरपंच सुमित गावंडे, चिचगाव येथील नारायण भांडे आणि धनज येथील सरपंच शाहीन शहा यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी