पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होणार


       यवतमाळ दि.12 : जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत सर्व बँकांनी विशेष मोहीम राबवावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँकर्सच्या बैठकीत दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपनिबंधक सहकारी संस्था अर्चना माळवे, अग्रणी बँकेचे सहाय्यक प्रबंधक सचिन नारायणे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणे, असा या मोहिमेचा उद्देश असून त्याचा कालावधी दिनांक 8 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2020 असा राहणार आहे, असे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.
किसान क्रेडीट कार्ड मोहिमेची उद्दिष्टे : ज्या पी.एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड नाही, अशा शेतक-यांच्या जमिनीची कागदपत्रे बघून त्यांना नवीन किसान क्रेडीट कार्ड बँकेमार्फत द्यायचे आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव अर्ज बँकेमार्फत मर्यादा मंजूर करणे, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे किसान क्रेडीट कार्ड अक्रियाशिल आहे, ते क्रियाशील करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे 1.60 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा असणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा व कर्जमर्यादा बँका उपलब्ध करून देणार आहेत.
शेतकऱ्यांच्या 3 लक्ष रुपये पर्यंतच्या किसान क्रेडीट कार्ड कर्जमागणी अर्जावर कार्यवाही करताना प्रक्रिया खर्च, कागदपत्रांचा खर्च, तपासणी फी, इतर आकार तथा सेवा शुल्क माफ असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहेत मात्र किसान क्रेडीट कार्ड घेतले नाहीत, याची यादी तयार करणे, ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड घेतले नाही त्यांची यादी संबंधीत गावातील सरपंच, बँक सखी यांना देवून त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रोत्साहित करणे, पी.एम.किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना साधा एक पेजचा फॉर्म सीएससी सेंटरमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी जवळपासच्या सीएससी सेंटरला भेट देऊन किसान क्रेडीट कार्ड फॉर्म द्यावा. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता नजीकच्या बँक शाखेशी त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी