खेळांमुळे शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास







                                                     - पालकमंत्री संजय राठोड
v विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ
यवतमाळ दि.28 : मानवाच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींचा आपणाला सामना करावा लागत आहे. ताणतणाव, कामाची व्यस्तता आदीमुळे शरीराकडे तर दुर्लक्ष होतेच शिवाय मनही प्रसन्न राहत नाही. यावर मात करायची असेल तर मैदानी खेळांकडे आपल्याला वळावे लागेल. कारण खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
नेहरू क्रीडा संकूल येथे अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, अमरावतीचे अपर आयुक्त मंगेश मोहिते, जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विस्पुते, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, रविंद्र देशमुख, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आदी उपस्थित होते.
यवतमाळ येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन झाले, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, स्वत:च्या शरीराकडे, मनाच्या प्रसन्नतेकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही. म्हणून व्याधीग्रस्त जीवन आपण जगत आहोत. मैदानी खेळांपासून आपण दूर गेलो. याच गोष्टींचा विचार करून शासन खेळाला प्रोत्साहन देत आहे. अधिकारी व कर्मचारी यांना नियमित कामकाजाच्या तणावातून मोकळा श्वास घेता यावा, मन प्रसन्न राहावे, यासाठी शासन स्तरावर विविध विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
महसूल विभाग हा राज्य शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग मानला जातो. सामान्य नागरिकांचे कोणतेही काम असो, महसूल प्रशासनाशिवाय पुर्णत्वास जात नाही. एकप्रकारे महसूल विभाग हा प्रशासनाचा मुख्य कणा आहे. मूळ कामासह महसूल विभाग अनेक जबाबदा-या सक्षमपणे पार पाडत असतो. दिवसेंदिवस कामाचा ताणतणाव प्रशासकीय व्यवस्थेत वाढत जात आहे. त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्यावर होतो. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या प्रत्येक कर्मचारी सक्षम असला पाहिजे, यासाठी खेळ उत्कृष्ट माध्यम, असेही ते म्हणाले.
या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेतून अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एक नवीन उर्जा मिळण्यास मदत होईल. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यसंस्कृतीवरसुध्दा जाणवेल व नागरिकांची कामे अधिक चांगल्या पध्दतीने  होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय सेवेत सुभेदार असलेले व शिवछत्रपती पुरस्कार विजेते हॉकीपटू आकाश चिकाटे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, यवतमाळ टीमने विभागीय स्पर्धांचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले आहे. संपूर्ण विभागात असे अत्याधुनिक सुविधांचे क्रीडा संकूल नाही, येथील स्टेडीयम चांगल्या दर्जाचे असून येत्या तीन दिवसांत खेळाडूंनी आपल्यातील प्रतिभा पणाला लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, मन प्रसन्न ठेवण्यासाठी खेळ हे उत्तम माध्यम आहे. आरोग्य हीच आपली संपत्ती असून निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने मैदानी खेळ खेळावे. यवतमाळ येथे क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण व मशाल लावून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी उपस्थित खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार भाग्यश्री देशमुख आणि धीरज स्थूल यांनी तर आभार ललितकुमार व-हाडे यांनी मानले. कार्यक्रमाला अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील खेळाडू तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी