जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण द्या - पालकमंत्री संजय राठोड






Ø आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण
यवतमाळ, दि. 22 : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे यांनी ख-या अर्थाने विणले. आज ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी हा शेतकरी, शेतमजुर आणि सामान्य नागरिकाचा असतो. या मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर), जि.प.सभापती सर्वश्री विजय राठोड, श्रीधर मोहोड, जयश्री पोटे, चित्तांगराव कदम, प्रिती काकडे, पावनी कल्यमवार, जि.प.सदस्य गजानन बेजंकीवार, रेणू शिंदे, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, शिक्षणाधिकारी दीपक चवणे आदी उपस्थित होते.
शिक्षक हे नेहमी नवनिर्माणाचे काम करतात, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शिक्षकांचा गौरव व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मुलांना बौध्दिक, शारीरिक, मानसिक शिक्षणासोबतच आपला विद्यार्थी सुसंस्कृत आणि जबाबदार कसा होईल, यासाठी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या मुलांना चांगल्या पध्दतीचे शिक्षण देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचे जाळे उत्कृष्ट निर्माण होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. ज्या काही समस्या असतील त्या निदर्शनास आणल्या तर नक्कीच सोडविण्याचा आपला मानस आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जि.प. प्राथमिक शाळा तरोडा येथील ज्योती राठोड, जि.प. उच्च प्राथमिक शाळा खडकसावंगा येथील वंदना कोषटवार, जि.प. उच्च प्राथमिक शाळा वरूड येथील मनोज भुजबले, जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिंचोली क्रमांक 2 येथील दुर्गादास गायकवाड, जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोरी महल येथील अरविंद झलके, जि.प. उच्च प्राथमिक शाळा तुळशी नगर येथील दशरथ सुर्यवंशी, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बाबाराव ढवस, जि.प. उच्च प्राथमिक शाळा मालखेड (बु.) येथील अपर्णा देशपांडे, जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा केळापूर येथील सुरेखा ठाकरे, जि.प. प्राथमिक शाळा निंबी येथील श्रीराव वानखेडे, जि.प. प्राथमिक शाळा खैरी येथील राजेंद्र दुरबुडे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा घिल्ली येथील दत्ता जालने, जि.प. प्राथमिक शाळा परमडोह येथील निलेश सपाटे, जि.प.  प्राथमिक शाळा बोथगव्हाण येथील सुनिता जातकर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा मांगली येथील विठ्ठल गोपतवार यांच्यासह विशेष पुरस्कार (दिव्यांग) जिल्हा परिषद केंद्र शाळा काटखेडा येथील अमित दत्तात्रय बोजेवार, विशेष पुरस्कार राजू दिगांबर काकडे यांना देण्यात आला.
 तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये निखील ठाकरे, अंजली शिंगारे, पवन काळे, नसरीन अंजुम फिरोज खान आदी विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘शिक्षक मित्र’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी तर संचालन कैलास राऊत यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य्, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी