शिक्षणातूनच होणार भटक्या समाजाचा विकास - विजय वडेट्टीवार





घरकुलाचा प्रश्न लवकरच सोडवणार
यवतमाळ दि.8 : भटक्या समाजाकरीता घरकुलाचा प्रश्न प्राधाण्याने सोडविणार येईल. मात्र समाजाचा विकास हा फक्त घरे बांधून होत नाही, त्यासाठी मुलांना योग्य शिक्षण  व चांगले संस्कार देणेही गरजेचे आहे. भटक्या जमातीच्या मुलांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नामांकित इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्यासाठी राखीव जागेची तरतूद करण्यात येईल. तसेच शिक्षित मुलांना कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्यातील भंडारी (नाथ) या नाथजोगी वस्तीत व भांब (राजा) या वडार वस्तीत त्यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव श्री गावीत, उपायुक्त विजय साळवे, तहसिलदार धीरज स्थुल, अनिल आडे, देवानंद पवार, जितेंद्र मोघे, राहुल ठाकरे,  सरपंच चंद्रकला शिंदे, शुभांगी ब्राम्हणे, विलास पवार, संजय धोत्रे, नारायण शिंदे आदि उपस्थित होते. 
श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, आता भटक्या समाजाने रुढी परंपरेला छेद दिला पाहिजे. घरातील मोठे धुम्रपान करत असतील तर मुलांवर चांगले संस्कार कसे घडतील. त्यामुळे पहिले आपल्यात बदल घडवा तेव्हा समाज सुधारेल.  लहान मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना शिक्षीत करा, मुला-मुलींचे लग्न कमी वयात लावू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  मंत्रालयात बसून आपल्या वेदना समजू शकत नाही म्हणून मी मुद्दाम आपल्या समस्या जाणून घ्यायला आलो आहे. गरीब वंचितांच्या समस्या समजून घेवून त्यानुसार भटक्या समाजाकरिता शासनाचे नवीन धोरण तयार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुलं शाळेत जातात का ? आश्रमशाळेत का नाही पाठवत ? घरकुल मिळण्यास काय अडचणी आहेत का ? संजय गांधी निराधार योजनेचे फायदे मिळतात का ? प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे मिळतात का ? इ. प्रश्न विचारून त्यांनी भटक्या समाजातील लोकांची आस्थावाईकपणे चौकशी केली. तर नाथजोगी समाज कधीपर्यंत भिक्षा मागून जगणार, सतत भटकंतीमुळे या भटका समाजाला अधिवासाचे दाखले मिळत नाही, त्यामुळे घरकुल मिळत नाही.  दगड फोडणे, माती खोदणे हे वडार समाजाचे परंपरागत व्यवसाय यांत्रीकीकरणामुळे बंद पडले आहेत, रोजगाराच्या दुसऱ्या संधी नाही अशा समस्या यावेळी या समाजाच्या लोकांनी मांडले.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी