कुसुमाग्रज यांचे साहित्य दिशा देणारे – डॉ. रमाकांत कोलते





v जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालायातर्फे मराठी भाषा गौरव दिन
यवतमाळ, दि. 27 : मराठी भाषेबद्दल मन जागृत राहावे, या निमित्ताने वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचे साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन वि.भि. कोलते संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय येथे जिल्हा माहिती कार्यालय व ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनादिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक संजय डहाके, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
‘भाषा मरता देश मरतो’ असे सांगून डॉ. कोलते म्हणाले, आपली संस्कृती, स्वाभिमान, गौरव, प्रतिष्ठा हे सर्वकाही भाषेवरच अवलंबून आहे. प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. इ.स.पुर्वी 600-700 वर्षांपूर्वीपासून मराठी भाषा अस्तित्वात आहे. 12 व्या शतकात अत्यंत दर्जदार मराठी साहित्याची निर्मिती झाली. आंरभीच्या काळात संतांनी साहित्य्‍ निर्माण केले. तसेच गितेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा विकासासाठी अनेक संस्था त्यांच्या कार्यकाळात सुरू केल्या. लोकांपर्यंत आपल्या भाषेतूनच चांगला संवाद करता येतो. आजकाल केवळ इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला किंवा इंग्रजी बोललो की आपला विकास झाला, असा गैरसमज आहे. शिक्षणात इंग्रजीला महत्व असले तरी मराठी माध्यमात शिकून आजही अनेक व्यक्ती मोठमोठ्या पदांवर विराजमान आहे. प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसाद करून ती जपली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विनोद देशपांडे, संजय डहाके यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. तत्पूर्वी डॉ. रमाकांत कोलते यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन : जिल्हाधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सविता चौधर तर मंचावर उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, माहिती व सुचना अधिकारी राजेश देवते, नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, अमोलकचंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख श्री. बुटले आदी उपस्थित होते. यावेळी सविता चौधर यांनी उपस्थितांना भाषा प्रतिज्ञा दिली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी