पालकमंत्र्यांच्या हस्ते तेलगव्हाण सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ







यवतमाळ, दि. 24 : दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथील सिंचन तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जि.प. सदस्या आश्विनी कुरसंगे, पं.स.सदस्या सविता जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री. राठोड म्हणाले, स्व. वसंतराव नाईक यांनी कृषी, जलसंधारण आदी क्षेत्रात अविस्मरणीय काम केले आहे. त्यांच्या विचारानुसारच काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. तेलगव्हाण येथील लाभक्षेत्रातील भुसंपादनासंर्भात जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करण्यात आली आहे. गावखेड्यातील समृध्दीचे वातावरण निर्माण करून युवकांच्या हाताला काम, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, सिंचन व्यवस्था, यासारख्या विकासाच्या गोष्टीला आपले प्राधान्य राहील, असेही ते म्हणाले.
तेलगव्हाण सिंचन तलावाचे काम जि.प. सिंचन विभागाने रोजगार हमी योजनेतून सन 1987-88 मध्ये पूर्ण केले. ऑगस्ट 2018 रोजी दारव्हा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने धरणाचे मातीकाम वाहून गेले. त्याअनुषंगाने धरणाची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 89.44 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तेलगव्हाण येथील सिंचन तलावाच्या धरण भिंतीची लांबी 152  मीटर असून महत्तम उंची 10.15 मीटर आहे. या धरणांतर्गत सिंचनाचे क्षेत्र 48 हेक्टर आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी