जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ




Ø पहिल्या टप्प्यात 546 शेतक-यांची यादी प्रसिध्द
यवतमाळ, दि. 24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र खातेदारांच्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेला आजपासून (दि.24) सुरवात झाली. यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दिग्रस आणि राळेगाव तालुक्यातील 546 शेतक-यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात आजपावेतो 1 लक्ष 2 हजार 495 खातेदारांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण पात्र खातेदारांच्या 95 टक्के आहे. त्यानुसार आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 546 शेतक-यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. यात राळेगाव तालुक्यातील 315 तर दिग्रस तालुक्यातील 231 शेतकरी सभासदांचा समावेश आहे.
दोन्ही तालुक्यातील शेतक-यांच्या याद्या पोर्टलवरून डाऊनलोड करून संबंधित तालुक्यास देण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यात सदर याद्या तहसील कार्यालय, संबंधित बँक शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दिग्रस तालुक्यातील विजय सरदार, गणेश सावरकर, गुलाब मुजमुले (सर्व खातेदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांना तर राळेगाव तालुक्यातील गजानन राऊत, मंदाबाई गवळी (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) आणि धनराज श्रीरामे (भारतीय स्टेट बँक) यांचे बायोमेट्रीक मशीनद्वारे आधार प्रमाणीकरण झाले असून संबंधित शेतक-यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावती देण्यात आली आहे. शेतक-यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दिग्रस व राळेगाव येथे सुरळीत सुरू असून या कामकाजावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार तसेच सहाय्यक निबंधक लक्ष ठेवून आहेत.
पात्र शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ तसेच संबंधित बँक शाखा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे. दोन तालुक्यातील यादी प्रसिध्दीनंतर काही अडचणी असतील तर त्यांची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतक-यांनी ऑनलाईन माहितीची खात्री करून कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी