रब्बी व बारमाही पिकांसाठी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.11 आक्टेाबर(जिमाका):-उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची (ईसापुर धरणाच्या) ऑक्टोंबरअखेर धरणाची पाणीपातळी 441 मीटर म्हणजे 100 टक्के ठेवण्याचे निर्धारित आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील लाभक्षेत्रांतर्गत रब्बी हंगाम, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी-नाले उपसा सिंचनासाठी लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 31 ऑक्टोबर 2022 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. धरणात दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी 100 टक्के पाणीसाठा होणार असून उपलब्ध पाणीसाठाच्या अनुषंगाने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास कालवा सल्लागार समितीच्या होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्या अनुषंगाने हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संबंधित लाभधारकांनी अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टीं न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदी नाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास प्रकल्प विभाग कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. सन 2022-23 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. अंतिम क्षेत्रास पाणीपुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आलेल्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे. अन्यथा पाणीपुरवठा केला जाणार नाही. जनतेने सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 चे उप कार्यकारी अभियंता सु. वा. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी