आपले विचार प्रगल्भ करण्यासाठी वाचन आवश्यक - जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका) :- वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी व आपले विचार अधिक प्रगल्भ करण्यासाठी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. वाचनापासून कधीही दूर जाऊ नका व आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रांना वाचनाच्या प्रवाहात सामिल करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यात “रिडींग मॅरॉथॉन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त जिल्हाधिकारी यांनी आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय तसेच मंगलाताई सतर्क सार्वजनिक वाचनालय येथे भेट देवून वाचकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, जिल्हा ग्रंथलय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, प्रा.राम पंचभाई, अजय यादव, रंजना तरवरे प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या मोबाईल युगात सोशल मिडीयावर अनावश्यकपणे आपला वेळ वाया जात आहे, तसेच वाचनाची सवय मागे पडत आहे. मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांची सवय लागावी तसेच नोकरदार वर्ग, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, यांना वाचनीची गोडी लागावी या उद्देशाने जिल्ह्यात रिडींग मॅरॉथॉन हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाचन हे केवळ एक दिवसापुरते न करता वर्षभर वाचन करत राहावे. वेळ नसणाऱ्यांनी ऑडिओ बुक्स वापर करावा. ग्रंथालयांनी वाचनाची चळवळ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी विविध वाचक नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचे उमेदवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी