इतर मागासवर्ग वित्त महामंडळाच्या कर्ज योजना

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- इतर मागासवर्गातील व्यक्ती, कुटूंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रुपये 10 लक्ष पर्यंतची कर्ज योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना या महत्वाच्या योजना राबविल्या जातात. यातील एक लक्ष व 10 लक्ष पर्यंतच्या कर्ज योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. रु. 1.00 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना : यात अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.1.00 लक्ष. लाभार्थींचा सहभाग निरंक राहील. दरमाह दोन हजार 85 रुपये याप्रमाणे 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रु. 10.00 लक्ष पर्यंतची कर्ज योजना : अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरीता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करुन देणे. वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य. बँकेमार्फत लाभार्थींना रुपये 10 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 8 लक्ष पर्यंत असावी. परतफेडीचा कालावधी बँक निकषांनुसार राहील. तरी वरील कर्ज योजनांचा इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या यवतमाळ शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी