नवउद्योजकांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- तळागाळातील नवउद्योजकांचा आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवून राज्यातील उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आयोजित केली आहे. आयोजनाचा दुसरा टप्पा 13 ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथून सुरू करण्यात येत असून या उपक्रमात सहभाग नोंदवून जिल्ह्यातील नवउद्योजकांनी स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. स्टार्टअप यात्रा आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 4 ऑक्टोबर रोजी महसूल सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्टार्टअप यात्रा : तालुकास्तरीय प्रचार व प्रबोधन - तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता एक वाहन (मोबाईल व्हॅन) यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविला जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देण्याकरिता फिरलेले आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा – दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर सव सादरीकरण सत्र दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबत माहिती सत्र स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम संकल्पना सादर करणाऱ्यांना प्रथम बक्षीस रुपये 25 हजार, द्वितीय बक्षीस रुपये 15 हजार ,तृतीय बक्षीस रुपये 10 हजार पर्यंतचे पारितोषिक मिळणार आहेत. राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांचे घोषणा - जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यातील विजेत्यांना 1 लाख रुपयापर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील. सदर यात्रेचा शुभारंभ 15 ऑगस्ट, 2022 रोजी पासून सुरू झालेला असून अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्यावी. इच्छुक नवउद्योजकांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण किंवा शंका असल्यास अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 07232-244395 किंवा मोबाईल क्रमांक 8379898798 आणि 9657541637 यावर वर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी