जिल्ह्यात एकतरी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नवउद्योजक व व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आवाहन

यवतमाळ दि. 13 ऑक्टोबर (जिमाका) :- नागरिकांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावर स्टार्टअप यात्रा सुरू केली आहे. या स्टार्टअप यात्रेत नवउद्योजक तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न तथा समस्या सोप्या पद्धतीने सोडविणाऱ्या कल्पना मांडून जिल्ह्यात एकतरी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली. जिल्हास्तरीय स्टार्टअप प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत आज शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, माविमचे रंजन वानखडे व इतर विविध विभागाचे अधिकारी तसेच नोंदणीकृत नवउद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की, छोटोमोठे काम सहज करण्यासाठी नवनवीन कल्पना अनेकांना सूचतात. सामान्यजनांचे कष्ट कमी करून त्यांच्या समस्या सोडविणाऱ्या, उत्पादन वाढविणाऱ्या व सर्व ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या अशा कल्पना स्टार्टअपसाठी सूचविण्यास सांगितले. शाळा, आयटीआय, पॉलिटेक्नीक, तसेच इंजिनिअरींग इत्यादी व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या सर्व महाविद्यालयांनी तथा शिक्षण संस्थांनी किमान 10 टक्के विद्यार्थ्यांकडील चांगल्या कल्पनांना स्टार्टअप मध्ये रूपांतरीत करण्याचे व आपल्या कल्पनेच्या उद्योगाचे पेटन्ट रजिस्टर करणारे विद्यार्थी महाविद्यालयातच घडाविण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. देशात एक अब्ज अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त मुल्यांकनाचे 107 युनिकार्न स्टार्टअप आहेत. त्यापैकी 30 टक्के स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रात असून यवतमाळ जिल्ह्यातून देखील किमान एक तरी युनिकॉर्न स्टार्टअप तयार व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कोणत्याही छोट्या स्टार्टअपला योग्य वातावरण व योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो मोठ्या उद्योगात परिवर्तीत होऊ शकतो, असे सांगून जिल्ह्यातील महिला बचत गट, शेतकरी गट यांच्या स्टार्टअपला योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सांगितले. यावेळी 120 नवसंकल्पनांवर आधारित उद्योगांची नोंदणी व सादरीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यतिल काही उद्योजकांनी उद्योग कसे उभारले याबाबत थोडक्यात माहिती देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी