दिग्रस एमआयडीसीमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण करा. पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला दिग्रस तालुक्यातील प्रलंबित कमांचा आढावा प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

यवतमाळ दि.१५ (जिमाका) :- यवतमाळ, वणी व पुसद येथील एमआयडीसी व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर भागातील एमआयडीसीमध्ये उद्योगाबाबत उदासीन धोरण पाहायला मिळते. दिग्रस एमआयडीसीमध्ये उद्योगाबाबत असलेली उदासीनता दूर करण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात जागा घेतलेल्या सर्व व्यक्ती आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना उद्योग उभारण्यात येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात आणि उद्योगाबबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. दिग्रस शहर व तालुक्यातील २५ विकास कामांबबत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस नगरपरिषद येथिल सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध प्रलंबित विषय जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधीक्षक के. ए. धरणे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, पुसद उपविभागीय अधिकारी व्यंकट रठोड , तहसीलदार सुधाकर राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दिग्रस येथिल पोलीस वसाहत इमारत अतिशय जुनी असुन क्षतिग्रस्त झालेली आहे. त्यामुळे ८४ शासकिय निवासस्थाने असलेली नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा. नेर, दारव्हा आणी दिग्रस या तिनही तालुक्यात फ्लॅट पद्धतीप्रमाणे बांधकाम करुन निवासस्थाने उभारण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्यात. दिग्रस येथिल ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत असल्यामुळे येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे. त्यासाठी ईसापुर येथे जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठीचे स्ट्रक्चरल डिझाईन तयार करून १ महिन्याच्या आत अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. दिग्रस नगर परिषद अंतर्गत एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत ९५२ कुटुंबांच्या रखडलेल्या पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री यांनी या प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण करण्यासोबतच तृतीय पक्षाकडून तपासणी करून कंत्राटदाराला काळ्या यादित टाकण्याची कारवाई करावी अशा सूचना दिल्यात. अरुणावती नदी प्रकल्पाचा मुख्य कालव्याच्या वितरण प्रणालीच्या विशेष दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच त्यांनी या भागात पाणी वापर संस्थांची स्थापना करावी. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांचे संचालक मंडळ तयार करावे. तसेच वितरण प्रणालिचे अस्तरीकरण तपासावे. या भागात उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊ शकते का? याची चाचपणी करुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री राठोड यांनी यावेळी दिल्यात. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसनाची कामे तात्काळ पूर्ण करावीत असेही त्यांनी सांगितले. हरसुल गावाजवळील लोखंडी फुल वाहून गेल्यामुळे तेथे नवीन पुल तयार करणे, रुई तलाव खोलीकरण व सौंदर्यकरण करणे, भवानी टेकडी येथील पर्यटन स्थळाचा विकास करण्यासंदर्भात मंजूर विकास आराखड्यातील कामे जलद गतीने मार्गी लावणे, तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय याकरिता जागा मंजूर करून कामांना सुरुवात करणे, दिग्रस नगर परिषदे अंतर्गत मुस्लिम कब्रस्तानासाठी जागा खरेदी करणे, दिग्रस शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीचे खोलीकरण, स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी मोहीम राबवणे तसेच चौपाटीसाठी प्रस्ताव तयार करून घेणे ईत्यादी २५ कामांचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी घेतला. बैठकीला जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. ००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी