अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी वाटपासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर मदतनिधी वाटपात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

तालुकानिहाय नोडल अधिकारी नियुक्त यवतमाळ, दि. 7 ऑक्टोबर (जिमाका) :- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त झालेला मदत निधी वेळेच्या आत वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. नैसर्गिक आपत्ती सारख्या अतिसंवेदनशील विषयाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व निधी वाटप करण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात माहे जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरीता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार यांना वितरीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात निधी वाटपाची कार्यवाही तात्काळ पूर्ण व्हावी व नुकसान ग्रस्त बाधीत शेतक-यांना तातडीने शासनाची मदत मिळावी या करीता तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना जिल्ह्यातील बाधीत गावांचे समप्रमाणात वाटप करून याद्या तयार करून निधी वाटप करण्याचे कळविले आहे. परंतु राज्य ग्रामसेवक युनियन संघटना व महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटना यांनी सदर कामावर आमचा बहिष्कार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे आणि ग्रामसेवक व कृषि सहायक ह्यांची कृती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये अशोभनिय असल्याने त्यांना समज देवून निधी वाटपाकरीता याद्या तयार करण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित करण्याचे व समज देवून सुध्दा संबंधितांनी निधी वाटपाची कार्यवाही न केल्यास कामकाज टाळणा-या कर्मचा-यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करून करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांचे नुकसान होवुन जिल्ह्यातील शेतकरी आर्थीक अडचणीत सापडलेले आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण तसेच पुढील कालावधीत दिवाळीचा सण असल्यामुळे बाधीत शेतकऱ्यांना वेळेच्या आत शासनातर्फे प्राप्त मदत निधी वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. हे काम तत्परतेने पुर्ण करून घेण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी