गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लक्ष रुपये आर्थिक सहाय्य

यवतमळ, दि ८ जुन :- पूर्वी राज्य शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपन्यांकडे भरायचे आणि विमा कंपनी शेतक-यांचे प्रस्ताव तपासून ते मान्य करायचे. हा विलंब टाळण्यासाठी आणि अपघातग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या उद्देशाने शासनाने नवीन गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना मंजूर केली आहे. अपघातात आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे तसेच वारसाच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार आहे. राज्यात यापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती. मात्र विमा कंपन्यांच्या असमाधानकारक अनुभवामुळे आता शासनाने शेतक-यांना स्वत:च आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेऊन त्याची घोषणा यावर्षीचे अंदाजपत्रक सादर करताना केली आहे.तसेच या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे. योजनेत समाविष्ट अपघात राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता/ रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांच्या चावण्यामुळे मृत्यू, किंवा जखम, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, दंगल तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित, आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू, अथवा अपंगत्व आल्यास या योजनेतून लाभ देण्यात येतो. योजनेअंतर्गत मिळणारे लाभ या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लक्ष रुपये तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लक्ष रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. लाभार्थी पात्रता राज्यातील १० ते ७५ वयोगटातील वाहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठी यांच्याकडील गाव नमुना क्रमांक 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, किंवा निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील यांची माहिती अहवाल आवश्यक आहे. संपर्क: संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी