मान्सून पूर्व कामे एक आठवड्यात पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना पाचही जिल्ह्यांचा घेतला आढावा

यवतमाळ, दि १ जुन :- नाले साफसफाई, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्यासोबतच, 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना, पुरबाधित गावात अन्न, पाणी व पुरेसा औषध साठा याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी दिल्यात विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी विभागातील पाचही जिल्ह्यांचा मान्सूनपूर्व तयारीचा आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. यात त्यांनी सदर सूचना केल्यात. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देतांना सांगितले, जिल्ह्यातील 15 गावांचा चार ते पाच दिवसांसाठी संपर्क तुटतो. त्यामुळे यावर्षी यादृष्टीने जास्त तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 169 गावे पूरबाधित होतात. त्यापैकी 116 गावे संवेदनशील आहे, तर 53 गावे अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पूर येणाऱ्या गावात औषध,अन्न व पाणी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अशा गावांमध्ये पाणीपुरवठा आणि जलजीवन मिशनची कामे मान्सुन सुरु होण्यापुर्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी भागात इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एक आठवड्यात पूर्ण होईल. त्याचबरोबर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असुन तो 24 तास सुरु ठेवण्यासाठी कर्मचा-यांची सेवा घेण्यात आली आहे. वीज पडुन मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वीज अटकाव यंत्र 110 ठिकाणी स्थापित करण्यात येणार असून सर्वच ठिकाणी वीज अटकाव यंत्र स्थापित करण्याचे मागणी होत आहे. त्याचबरोबर विजेपासून बचाव करण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी