दिव्यांगांना एकाच ठिकाणी सर्व दाखले व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे

"दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" अभियान 6 जूनपासून जिल्ह्यात राबवणार यवतमाळ, दि ५ जुन:- दिव्यांगांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्यांना त्रास होतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" हे अभियान 6 जून पासून राज्यभर राबविण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यात हे अभियान राबवताना दिव्यांगांना एकाच ठिकाणी सर्व दाखले आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. हे अभियान राबवण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकिला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, डॉ. तरंगपल्लिवार, नगर परिषद प्रतिनिधी तसेच दिव्यांग सदस्य उपस्थित होते. या अभियानामध्ये दिव्यांगांना विविध दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे. या शिबिरामध्ये एकाच दिवशी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था यांना दिव्यांगांच्या विविध अडचणी आणि तक्रारी सोडविण्यासाठी सहभाग घ्यावा. शिबिरामध्ये दिव्यांगाना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी योजनेचा लाभ, घरकुल योजनेचा लाभ, शिधापत्रिका, नगरपालिकेमार्फत दिव्यांगांना देण्यात येणारा भत्ता, कौशल्य विकासाच्या योजना, दिव्यांगाना, एम्प्लॉयमेंट कार्ड तसेच विभाग नियंत्रक एस टी महामंडळ यांच्यामार्फत दिव्यांगाना देण्यात येणारे एसटीची कार्ड इत्यादी सर्व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील अशी व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना दिल्यात. सध्या जिल्ह्यात २३००० दिव्यांगांची नोंदणी झाली असुन पैकी १९ हजार दिव्यांगांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहेत. उर्वरित ४ हजार प्रमाणपत्र या शिबिराच्या माध्यमातुन देण्यात यावे. आधार कार्ड १०० टक्के दिव्यांगांना देण्यासाठी शिबिर घ्यावे, तसेच दिव्यांगाना साधनांचा पुरवठा करणेसाठी त्यांच्या आवश्यक साहित्याची नोंदणी करुन ते अल्मिको कंपनीला कळवावे असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी