अनधिकृत व बोगस बियाण्यांची विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल करा जिल्हाधिकारी यांचे आदेश

यवतमाळ, दि 20 जून जिमाका:- कृषि निविष्ठांचा काळाबाजार करणा-यांवर तसेच अनधिकृत व बोगस बियाण्यांची विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच बोगस बियाणे तयार करणा-यांची गोदामे शोधून पुढील दहा दिवसात अनधिकृत बियाणे जप्त करण्याची कारवाई करावी. शेतकऱ्यांना यापुढे बोगस बियाणे मिळणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे सक्त आदेश आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. खरीप हंगाम २०२३ मध्ये कृषि निवीष्ठांच्या नियोजनासाठी आज जिल्हास्तरीय कृषि निवीष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये जिल्ह्याला आवश्यक बियाणे व खते याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषि निवीष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या १७ भरारी पथकामार्फत प्रत्येक तालुक्यात तपासणी करावी व अनधिकृत बियाणे व खते विक्री व साठा करणा-यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. अवैधरित्या अनधिकृत कापुस बियाण्यांची (HTBT) वाहतुक, वितरण, विक्री व साठवणुक होवु नये याकरीता भरारी पथकामार्फत तपासण्या करुन कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीत पुरेशी ओल म्हणजे १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतक-यांनी पेरणी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच दुबार पेरणी करावी लागल्यास त्यासाठी बियाण्यांचे व खताचे नियोजन कृषी विभागाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे खरेदी करतांना जिल्ह्यातील नोंदणीधारक कृषि विक्रेते यांचे कडुन पक्के बिल घेवुनच खरेदी करावी. एका विशीष्ट व्हरायटीच्या बियाण्याची मागणी करू नये. तसेच राखुन ठेवलेले घरचेच सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची तपासणी करुनच वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. खरेदी केलेल्या बियाण्यांचे उगवणीबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना पेरणीपासुन ७ दिवसाचे आत त्याबाबतची तक्रार लिखीत स्वरुपात संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालय किवा कृषि विभाग, पंचायत समिती येथे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार ७ दिवसाचे आत त्यावर कृषि विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश सुध्दा जिल्हाधिकारी यांनी दिलेत. बियाणे व खते याबाबत शेतक-यांना अडचण आल्यास 9403 22 999 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. बैठकिला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कृषी अधीक्षक प्रमोद लवाडे, जिल्हा कृषीविकास अधिकारी राजेंद्र माळोदे,पोलीस निरीक्षक भुनेश्वर, महाबीजचे डॉ. अशोक ठाकरे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी