वर्षभर उत्पन्न देणारी रेशीम शेती मनरेगातून व पोकरामधुन अनुदान

यवतमाळ, दि३१मे:- शेतीतुन वर्षभर उत्पादन घ्यायचे तर रेशीम शेती कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीतून वर्षभरात सहा ते सात वेळा रेशीम कोषाचे उत्पन्न मिळते. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच रेशीम शेतीकडे वळून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करता येतो. रेशीम विकास विभागाच्यावतीने वेगवेगळ्या योजना यासाठी राबविण्यात येत आहे. मनरेगातून राबविण्यात येत असलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना 2 लाख 36 हजारापर्यंत अनुदान दिले जाते तर पोकरा योजनेतून ९० टक्के अनुदान देण्यात येते. कृषीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला रेशीम हा शेतीपुरक उद्योग आहे. विविध योजनेंतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन शेतकरी लाभार्थीची निवड केली जाते. तुती लागवडीसाठी कलमांचा पुरवठा केले जातो व तांत्रिक मार्गदर्शन देऊन तुती लागवड केली जाते. नवीन लाभार्थ्यांना रेशीम शेती उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. नवीन तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अथवा राज्यांतर्गत अभ्यास दौरा आयोजित केला जातो. नवीन निवड केलेल्या लाभार्थ्यांना तुती लागवड करण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांकडून तुती कलमे खरेदी करुन प्रति एकर लागवडीसाठी एक टन कलमे सवलतीत पुरवठा केली जातात. त्याचा दर प्रति टन 1 हजार 500 इतका आहे. लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये म्हणजे फक्त 25 टक्के दरात अंडीपूंजांचा पुरवठा केला जातो व 75 टक्के अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना मागणीनुसार वर्षभर अंडीपूंज पूरवठा केला जातो. रेशीम शेती करण्यासाठी मनरेगा अंतर्गत तुती लागवड व किटक संगोपनगृह बांधकामासाठी अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी एक एकर क्षेत्राकरीता 682 मनुष्य दिवस तीन वर्षाकरीता 256 रुपये प्रमाणे मजुरी दर मंजुर केले जातात. पहिल्या वर्षी मजुरी खर्च 72 हजार 192 व साहित्य सामुग्री 41 हजार 160 असे एकुण 1 लाख 13 हजार 352 अनुदान मंजुर केले जातात. दुसऱ्या वर्षी मजुरी खर्च 51 हजार 200 रुपये व साहित्य सामुग्री 10 हजार 285 असे एकुण 61 हजार 485 मंजुर केले जातात. तिसऱ्या वर्षी मजुरी खर्च 51 हजार 200 व साहित्य सामुगी 10 हजार 285 असे एकुण 61 हजार 485 अनुदान दिले जाते. असे तीन वर्षासाठी एक एकर करिता 2 लाख 36 हजार 322 अनुदान दिले जाते. किटक संगोपनगृह बांधकामासाठी अनुदान 213 मनुष्य दिवसांसाठी 1 लाख 65 हजार व मजुरी रुपये 54 हजार 528 व सामुग्रीसाठी रुपये 49 हजार 50 योजनेंतर्गंत मंजुर केले जातात. पोकरा योजनेतून 90 टक्के अनुदान नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेंतर्गत देखील तुती लागवड व किटक संगोपन गृहासाठी अनुदान दिले जाते. त्यात तुती लागवड विकास योजनेंतर्गत प्रकल्प किंमत 50 हजार रुपये आहे. एक हजार स्क्वेअर फुटमध्ये किटक संगोपन गृह बांधकामासाठी प्रकल्प किंमत 1 लाख 68 हजार, ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन योजना 50 हजार तर किटक संगोपन साहित्यासाठी प्रकल्प किंमत 75 हजार रुपये इतकी आहे. वरील प्रत्येक बाबीसाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांना प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी