प्रत्येक बँकांनी पीक कर्ज वाटपाचे 100 टक्के नियोजन करावे




 


Ø जिल्हाधिका-यांचे बँकांना निर्देश

       यवतमाळ, दि. 15 : राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध असले तरी कृषी क्षेत्र आणि त्यावर संलग्न व्यवसायाला मुभा आहे. तसेच बँकासुध्दा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोव्हीड बाबत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यावर्षीच्या खरीप हंगामात प्रत्येक बँकांनी 100 टक्के पीक कर्ज वाटपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक बँकाच्या प्रतिनिधींशी तसेच इतर प्रतिनिधींशी ऑनलाईन पध्दतीद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रमेश कटके, भारतीय स्टेट बँकेचे गिरीश कानेर आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या दृष्टीने खरीप हंगामात शेतक-यांना पीक कर्ज वाटप हा प्राधान्याचा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे, असे सांगून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पात्र शेतक-यांना कर्जाचे वाटप करायचे आहे. गतवर्षीची उद्दिष्टपूर्ती पाहून यावर्षी प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीतसुध्दा पंचसुत्रीच्या नियमांचे पालन करून शेतक-यांना कर्जवाटप होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे गतवर्षी कोरोनाबाबतचे निर्बंध अतिशय कडक होते. यावर्षी कृषी क्षेत्राला यातून मोठ्या प्रमाणात सवलत मिळाली आहे. त्यामुळे कर्जवाटपात बँकांना कोणतीही अडचण राहता कामा नये. कर्जवाटपासाठी जास्त शेतक-यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर शेतक-यांना गावातच कसे कर्ज उपलब्ध होऊ शकते, याचे नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

सन 2021 – 22 करीता जिल्ह्याला 2280 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात रब्बी हंगामासाठी 2210 कोटी तर रब्बी हंगामासाठी 70 कोटींचे वाटप करावयाचे आहे. खरीप हंगामाकरीता सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असून पीक कर्जवाटपाचा हा आकडा 637 कोटी 93 लक्ष रुपयांचा आहे. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला 598 कोटी 34 लक्ष रुपयांचे उद्दिष्ट, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 183 कोटी 43 लक्ष रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला 164 कोटी 94 लक्ष रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रला  152 कोटी 76 लक्ष रुपये आणि युनियन बँक ऑफ इंडियाला 139 कोटी 45 लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशविाय इतरही बँकांना पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यात 1693 कोटींचे (75 टक्के) पीक कर्ज वाटप झाले होते. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा हा कर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर होता.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी