पालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी

 




Ø वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट

       यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची पाहणी करण्याकरीता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी वणी, पांढरकवडा आणि मारेगाव येथे भेट दिली.

            वणी येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ नुकतेच सुरू करण्यात आले असून येथील सोयीसुविधा, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे 16 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वणी ते यवतमाळ हे अंतर फार लांब आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला यवतमाळ येथे स्थलांतरीत करावयाचे असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत संबंधित रुग्णाला ऑक्सीजनची पुर्तता करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.

            जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर व मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी गांभिर्याने सर्व्हे करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आल्यास संबंधितांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती करणे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने अतिशय गांभिर्याने कामे करावीत, असेह निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

            यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, पंचायत समिती  सभापती श्री. पिंपळखेडे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी श्री. गायनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुलभेवार, ठाणेदार वैभव जाधव आदी उपस्थित होते.

            यानंतर पालकमंत्र्यांनी करंजी येथील ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी