बोगस बियाणांची वाहतूक व पुरवठ्याला आळा घाला – पालकमंत्री भुमरे

 





Ø जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

       यवतमाळ, दि. 30 : शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्याची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खते, किटकनाशक आदींचा पुरवठा शेतक-यांना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने बोगस बियाणे येत असल्यास त्याच्या वाहतूकीवर तसेच पुरवठ्यावर आळा घालून संबंधितांवर कडक कारवाई करा, असे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी कृषी विभागाला दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार सर्वश्री, बाळू धानोरकर, भावना गवळी, आमदार सर्वश्री इंद्रनील नाईक, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

खरीप हंगाम हा शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, या हंगामाच्या भरोशावरच त्याचा संपूर्ण वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो. त्यामुळे शेतक-याला उच्च प्रतिचे बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. बोगस बियाण्यासंदर्भात अनुपालन अहवाल त्वरीत सादर करावा. परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून कोणत्याही मार्गाने बोगस बियाणे येणार नाही, यासाठी चेक पॉईंटवर पोलिस विभागाचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

खतांच्या रॅक पॉईंटबाबत पालकमंत्री म्हणाले, सद्यस्थितीत धामणगाव येथील रॅक पॉईंटवरून खतांचा पुरवठा केला जातो. मात्र पुसद आणि लगतच्या तालुक्यांसाठी वाशिम येथे रॅक पॉईंट उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन केले जाईल. कृषी सहाय्यकाने गावापर्यंत पोहचून शेतक-यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र कृषी सहाय्यक गावात येत नसल्याच्या तक्रारी शेतक-यांकडून होतात. त्यामुळे कोणत्या दिवशी, कोणत्या गावात कृषी सहाय्यक उपलब्ध राहील, याबाबत वेळापत्रक तयार करा. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी सहाय्यक बसला पाहिजे, याबाबत सक्त सुचना कृषी विभागाने द्याव्यात, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यामध्ये खरीपाचे सर्वसाधारण 9 लक्ष 2 हजार 70 हेक्टर क्षेत्र असून गत हंगामात 8 लक्ष 97 हजार 370 हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती. यात कापूस 4 लक्ष 65 हजार 562 हजार हेक्टरवर, सोयाबीन 2 लक्ष 81 हजार 674 हेक्टरवर, तूर 1 लक्ष 7 हजार 735 हेक्टरचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना फवारणी विषबाधा होऊ नये म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून 90 टक्के अनुदानावर 3533 शेतक-यांना 11.12 लक्ष रुपये खर्च करून संरक्षण किट पुरविण्यात आल्या होत्या. तसेच विविध उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातूनही संरक्षण किट देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत काम पूर्ण झालेल्या / निविष्ठा खरेदी केलेल्या 5487 लाभार्थ्यांना 10.74 कोटींचे अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी मागील पाच वर्षातील क्षेत्र व उत्पादकता, हवामान व पीकपध्दती, गुणनियंत्रक अहवाल लक्षांक  व साध्य, रासायनिक खते उपलब्धता, चालू हंगामात महिनानिहाय खतांची मागणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, खरीप पीक कर्ज वाटप आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी