जिल्ह्याला ऑक्सीजनचा मुबलक प्रमाणात पुरवठा




Ø आजी - माजी जिल्हाधिका-यांचे अहोरात्र प्रयत्न

       यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने अचानक उसळी घेतल्याने बाधित रुग्णांची तसेच मृत्युच्या आकड्यांची संख्या वाढत आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन 'मिशन मोड' वर काम करीत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यात कोणताही खंड पडू नये, यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. दोघांच्याही प्रयत्नातून जिल्ह्याला ऑक्सीजनचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत आहे, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

            यवतमाळ जिल्ह्याची रोजची ऑक्सीजनची गरज 18 ते 19 मेट्रीक टन आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जवळपास 12 ते 13 मेट्रीक टन ऑक्सीजन लागतो. उर्वरीत सहा ते सात मेट्रीक टन ऑक्सीजनची खाजगी कोव्हीड रुग्णालयाला आवश्यकता असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देवळी (जि. वर्धा) येथील आदित्य एअर प्रायव्हेड लिमिटेड या पुरवठादाराकडून सिलिंडर स्वरुपात ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात येत आहे. या पुरवठादाराकडून दररोज जवळपास 1200 सिलींडर ऑक्सीजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येतात. तर जिल्ह्यातील इतर 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयाची सात मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज मुकुंद रॉय गॅस एजन्सी आणि चिचबर्डी येथील ऑक्सीलाईफ गॅस या पुरवठादारांकडून भागविण्यात येत आहे. या दोन्ही खाजगी पुरवठादारांकडून जवळपास 700 सिलिंडर ऑक्सीजन खाजगी कोव्हीड रुग्णालयाला देण्यात येते.

            याशिवाय जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरवठा नियमित सुरू राहावा, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागपूर, चाकन, भिलाई येथून ऑक्सीजन टँकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनचा वापर काटकसरीने होण्यासाठी कंट्रोल पॅनल बदलविणे, लिकेज दूर करणे, ऑडीट करणे आदी उपाययोजना करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. या सर्व बाबीमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे ऑक्सीजनचा परिणामकारक वापर होण्यास मदत होत आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन पुरवठ्यामध्ये कोणतीही बाधा होऊ नये याकरीता नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा व्यवस्थापन समिती निर्माण करण्यात आली आहे. सदर समिती 24 बाय 7 पुरवठा व सनियंत्रणासाठी कार्यरत आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) ठेवण्यात आला आहे. तसेच ऑक्सीजनचा परिणामकारक वापर व्हावा, पुरवठा करणा-या यंत्रणेत त्रृटी राहू नये, याकरीता ऑक्सीजन ऑडीट करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्व कोव्हीड रुग्णालयात ऑक्सीजन ऑडीट करण्यात येत आहे.

            नागपूर व अमरावती विभागात ऑक्सीजन पुरवठा संदर्भात शासन स्तरावर अश्विन मुदगल तर जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे जबाबदारी पार पाडत आहेत. जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता नसून पुरेसा ऑक्सीजन पुरवठा होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

जिल्ह्यात आठ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्लाँटचे नियोजन : जिल्ह्यात पहिल्या पाच व दुस-या टप्प्यात तीन ठिकाणी हवेतून ऑक्सीजन निर्मिती करण्या-या प्लाँटचे नियोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय तसेच वणी, उमरखेड आणि राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लाँटमध्ये ऑक्सीजन निर्मितीची क्षमता 850 लिटर प्रति मिनीट असून महिला रुग्णालयाची क्षमता 425 लिटर प्रति मिनीट तर उमरखेड आणि वणी येथील प्लाँटची क्षमता 90 लिटर प्रति मिनीट आहे. दुस-या टप्प्यात दारव्हा, पांढरकवडा व पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्लाँटचे नियोजन करण्यात आले आहे.

 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी