केंद्रीय पथकाद्वारे लसीकरण केंद्र व सीसीसी ची पाहणी

 





       यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्युचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय पथक गुरुवारी यवतमाळ येथे दाखल झाले. पथकातील राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी शहरातील पाटीपुरा येथील लसीकरण केंद्र व वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली.

      यावेळी डॉ. दास व डॉ. भारती यांनी लसीकरण केंद्रातील नोंदणी कक्ष, लसीकरण प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण कक्षाची पाहणी करून लसीकरणाचे प्रा‍त्यक्षिक करायला सांगितले. केंद्रीय पथकाच्या समक्ष उपस्थित नर्सने लाभार्थ्याचे लसीकरण केल्यानंतर संबंधित नागरिकाला शासनाच्या सुचना समजावून सांगितल्या. लसीकरणानंतर एखाद्याला रिएक्शन झाली तर काय उपाययोजना करता, लसीकरणाबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले का, अशी विचारणा केली असता शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तसेच एखाद्याला रिएक्शन झाली तर संबंधित व्यक्तिला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले जाते. यासाठी लसीकरण केंद्रावर रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

            यानंतर केंद्रीय पथकाने वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथे कशाप्रकारे टेस्टे केली जाते. सध्या किती रुग्ण या केंद्रात भरती आहेत, त्यांना लक्षणे आहेत का, याबाबत माहिती घेतली. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे यांनी पथकाला माहिती दिली. या केंद्रावर 70 टक्के नागरिकांचे आरटीपीसीआर व उर्वरीत 30 टक्के लोकांचे ॲन्टीजन टेस्ट केली जाते. तसेच रॅपीड ॲन्टीजन निगेटिव्ह आली व लक्षणे असले तर संबंधितांची आरटीपीसीआरसुध्दा केली जाते. सध्यास्थितीत येथे 58 रुग्ण दाखल असून त्यांना कोणतीही लक्षणे नाही. तसेच रुग्णांची सकाळ, संध्याकाळ आणि रात्री नियमित तपासणी केली जाते. यात ताप, ऑक्सीजन स्थर तपासण्यात येत असल्याचेही डॉ. खोडवे यांनी सांगितले.

            यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तडपिल्लेवार, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. रमा बाजोरिया, आयएमएचे अध्यक्ष डॉ. टी.सी.राठोड आदी उपस्थित होते.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी