जिल्ह्यात आजपासून 'आम्ही यवतमाळकर....मात करू कोरोनावर' मोहिमेला सुरवात

 

Ø घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Ø जिल्हाभरात 1898 पथकांची निर्मिती, 218 पर्यवेक्षक नियुक्त

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्युचे प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 12 एप्रिलपासून 'आम्ही यवतमाळकर....मात करू कोरोनावर' ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागात 1898 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 218 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणासाठी घरी येणा-या पथकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

सर्व्हेक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या 1898 पथकांमध्ये यवतमाळसाठी 137 पथके, बाभुळगाव 98, कळंब 130, घाटंजी 105, राळेगाव 124, पांढरकवडा 135, वणी 126, मारेगाव 99, झरी 59, आर्णि 77, दारव्हा 130, दिग्रस 119, नेर 87, उमरखेड 124, महागाव 170 आणि पुसद करीता 178 पथक निर्माण करण्यात आले आहे. तर पर्यवेक्षकांची संख्या 218 आहे.

'आम्ही यवतमाळकर....' या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती आणि  नगर पालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

सदर मोहिमेंतर्गत ग्रामस्तरावर व नगर पालिका स्तरावर पथकांची निर्मिती करून या पथकाद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येणार आहे. यात कोव्हीडबाबत पंचसुत्री जसे मास्कचा सतत वापर करणे, सुरक्षित / सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, लक्षणे असल्यास / पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्वरीत कोव्हीड चाचणी करणे आणि 45 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांचे लसीकरण करणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

तसेच सर्व्हेक्षणदरम्यान कुटुंबातील व्यक्तिंना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आहे काय, वृध्द / दिव्यांग / सहव्याधीग्रस्त व्यक्तिंना काही त्रास आहे काय, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोव्हीड रुग्णाच्या संपर्कात आला आहे काय, त्याला काही लक्षणे आहेत काय, कुटुंबातील 45 वर्षांवरील पात्र सदस्यांनी लसीकरण केले आहे काय, आदींची माहिती जाणून घेण्यात येईल. ही माहिती घेण्यासाठी घरी येणा-या पथकाला सहकार्य करून योग्य माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी