गृहविलगीकरणासाठी आता रुग्णांना लिहून द्यावे लागणार बंधपत्र

 

Ø मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 10 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे निर्देशित केले आहे. परंतु गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून कोरोना नियमावलींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे आता गृहविलगीकरणाची मान्यता देतांना कोरोनाबाधित रुग्णाकडून बंधपत्र लिहून घ्यावे व त्यांच्याकडून नियमांचे पालन होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व दुस-यांना उल्लंघन केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी मार्गदर्शक सुचना : अतिदक्षतेकरीता विलगीकरणाचा कालावधी 17 दिवसांचा पाळणे जास्त परिणामकारक आहे. विलगीकरणाचा कालावधी रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या शेवटच्या दिवसापासून धरावयाचा असतो. या कालावधीमध्ये रुग्णांनी दुस-या व्यक्तिंशी (घरातील व घराबाहेरील) संपर्कात येऊ नये. किंवा बाहेरील व्यक्तीस घरात येऊ देऊ नये. विलगीकरणामध्ये आपल्या अंगावरील कपडे, वापरलेला हातरुमाल, टॉवेल, नॅपकीन कोरडेच असतांना थेट कपडे धुणा-याच्या संपर्कात येणार नाही व त्यास प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व कपडे साबणाच्या पाण्यात किंवा गरम पाण्यात टाकल्यास त्यापासून प्रादुर्भाव होणार नाही.

दोन माणसांमध्ये पाच ते सहा फुटांचे अंतर ठेवणे अतिशय परिणामकारक ठरते. बाधित रुग्णांनी मास्कचा वापर करावा आणि इतर लोकांपासून दूर राहावे. साबण व पाणी वापरून किंवा सॅनिटायझर वापरून साधारण प्रत्येक एक-दोन तासांच्या अंतराने हात स्वच्छ धुवावे. खोकलतांना किंवा शिंकतांना नाकावर व तोंडावर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरावा. सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोन वेळा ऑक्सीजन स्तर, ताप मोजून डॉक्टराला कळवावे. तसेच प्रकृतीमध्ये होणारे बदल व उद्भवणारी लक्षणे, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी बाबी तातडीने डॉक्टरांना कळवावे. स्वत:चे पल्स ऑक्सीमीटर व थर्मोमीटर वापरावे.

वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तिंनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची मात्रा घ्यावी. गृहविलगीकरणातील रुग्णाच्या खोलीचे दार आतून बंद ठेवू नये. तसेच बाथरुम-संडासमध्ये जातांना दाराला आतून कडी लावू नये. भाजी, किराणा, दूध इत्यादी दैनंदिन गरजेच्या वस्तु आणण्यासाठी रुग्णाने स्वत: किंवा घरातील सदस्यांनी जाऊ नये. गृहविलगीकरणामध्ये राहणा-या रुग्णाने काळजी घेणारी एक व्यक्ती जवळ ठेवणे बंधनकारक आहे.

रुग्णाने व काळजीवाहू व्यक्तिंनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे, ऑक्जीन सॅचूरेशनमध्ये कमतरता, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रामावस्था / शुध्द हरपणे, अस्पष्ट वाचा / झटके, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता, ओठ / चेहरा निळसर पडणे यासारखी गंभीर लक्षणे / चिन्हे आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. कोरोनाबाधित व्यक्तिपासून उत्पन्न होणार जैवैद्यकीय कचरा स्वतंत्र ठेवावा व त्याला कोणत्याही परिस्थितीत इतर कच-यासोबत मिसळू नये, असे मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.*******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी