बाल विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 


Ø  तहसीलदार व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने रोखला गेला बालविवाह

यवतमाळ, दि. 22 :  जिल्ह्यात संचारबंदी लागू असून शासनातर्फे विवाहासाठी मर्यादित लोकांची अट घालण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात लगीन घाई दिसून येत आहे. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेने अनेक बालविवाहाचे घाट उधळून लावण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एप्रिल महिन्यात आठ बालविवाह रोखले.

असाच एक नियोजित बालविवाह दिनांक 17 एप्रिल 2021 मुकिंदपूर (पारडी बेडा) ता. नेर येथे बाल संरक्षण कक्षाने थांबविला होता. त्यांच्याकडून  बालविवाहचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यत लग्न न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र याला न जुमानता त्याच मुलीचा विवाह 20 एप्रिलला वरमंडपी घाटंजी तालुक्यात पंगडी येथे नियोजित होता. याबाबत गोपनीय माहिती घाटंजी येथील तहसीलदार तथा तालुका बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा पूजा मातोडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क केला.

लग्नमंडपी प्रशासन पोहचले असताना मोठा सभा मंडप, डीजे, रोशनाई व नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह सोहळामध्ये शेवटचे मंगलाष्टक सुरु होते. मात्र वेळी प्रशासन धडकल्याने सर्वाची तारांबळ उडाली. या सोहळ्यात कोरोना काळातही मोठी गर्दी केल्याचे तसेच बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार तहसीलदार पूजा मातोडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमनच्या कलम 9,10, 11, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, 269, 34, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51(b), महाराष्ट्र COVID-19 विनियमन,2020 च्या कलम 11 नुसार घाटंजी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वधू व वधूचे आईवडील सध्यास्थितीत फरार आहे.

ही कार्यवाही घाटंजी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री. भुजाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आकाश बुर्रेवार, तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य अरुण कांबळे, ग्रामसेवक राजाराम बोईनवार, अंगणवाडी सेविका छाया चौधरी व अर्चना आत्राम, तलाठी मुन, मोहन बागेश्वर, सरपंच यमुना मेश्राम, उपसरपंच प्रमोद कदम, कोतवाल अमोल घोडाम, आदींच्या उपस्थितीत पार पडली.

बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये दोन वर्षे कारावास व एक लाख दंडाची तरतूद आहे. त्यामुळे बालविवाहबाबत नागरिकांनी अतिदक्ष राहावे. तसेच बालविवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष- दगडी इमारत, टांगा चौक- यवतमाळ अथवा चाईल्ड लाइन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेद्र राजूरकर यांनी केले आहे.

०००००००

 

 

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी