जिल्ह्यात 284 लसीकरण केंद्राचे नियोजन

 


Ø यवतमाळ शहरातील पाटीपूरा केंद्रावर सर्वाधिक लसीकरण

       यवतमाळ, दि. 27 : कोरोनाविरुध्दच्या लढाईत कोव्हीड प्रतिबंधात्मक लस हे एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात 284 केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे.

            16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर (यात महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचारी) यांनाच लस देण्यात आली. आता मात्र 45 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जवळपास 21 लक्ष लोकसंख्येला लस देण्याचे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 130 लसीकरण केंद्रावर लस देण्याचे काम सुरू आहे. यात 112 शासकीय केंद्र तर 18 खाजगी केंद्रांचा समावेश आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्यामुळे ग्रामीण भागात 230 लसीकरण केंद्र, शहरी भागात वाढीव 38 केंद्र आणि प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 16 मोबाईल टीम कार्यरत करण्यात येईल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. लस देणारी मुख्य व्यक्ती ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून तर कोव्हीन ॲप हाताळण्यासाठी शिक्षक किंवा इतर कर्मचारी मानधनावर घेण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळण्यासाठी शासन स्तरावर मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर रोज 100 याप्रमाणे 284 केंद्रावर दिवसाअखेर जवळपास 28 हजार लसीकरण होऊ शकते. मात्र लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी सांगितले.

 

आतापर्यंत जिल्ह्यात 2.25 लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण : जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत 2 लक्ष 25 हजार 144 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात आरोग्य यंत्रणेतील 17321 जणांना पहिला डोज, 8488 जणांना दुसरा डोज, 23178 फ्रंटलाईन वर्कर यांना पहिला डोज, 7089 जणांना दुसरा डोज, 45 वर्षांवरील 156481 जणांना पहिला डोज आणि 12587 जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहरातील पाटीपुरा शहरी प्राथमिक केंद्रावर सर्वाधिक म्हणजे 13750 जणांचे लसीकरण करण्यात आले असून त्यानंतर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात 9700 जणांचे लसीकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9150 जण, उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात 8620 जण, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 7970 जण आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 7350 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

  

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी