जिल्हाधिकारी आर्णि, महागाव व उमरखेडमध्ये ‘ऑनफिल्ड’

 




Ø कोरोनासंदर्भात तालुकास्तरीय यंत्रणेचा घेतला आढावा

       यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुकास्तरीय यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आर्णि, महागाव व उमरखेड मध्ये जाऊन आढावा घेतला.

            आर्णि तालुक्यातील भंडारी येथील कोव्हीड केअर सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांच्या काही अडअडचणी असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी टेस्टिंग वाढविणे आवश्यक आहे. तालुक्याला दिलेल्या टेस्टिंगच्या उद्दिष्टाप्रमाणे येत्या आठ दिवसांत पॉझिटीव्हीटी दर 5 पर्यंत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. लसीकरणाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण नियोजनबध्द पध्दतीने करा. कोणतीही लस वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच प्रतिबंधित क्षेत्र धोरण कडकपणे राबवा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या सुचनांबाबत (नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझरचा उपयोग) जनजागृती करा तसेच नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक दंडात्मक कारवाई करा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

            लवकर निदान तसेच टेस्टिंग झाले आणि वेळेवर उपचार मिळाला तर नक्कीच रुग्णसंख्येला आळा बसेल. परिणामी मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. त्या दृष्टीने नियोजन करा. प्रशासनाच्यावतीने ‘आम्ही यवतमाळकर……मात करू कोरोनावर’ ही मोहीम यशस्वीपणे राबवा, असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार परसराम भोसले, तालुका आरोग्य अधिकारी श्यामसुंदर शिंदे, गटविकास अधिकारी आनंद लोहकरे, ठाणेदार पितांबर जाधव आदी उपस्थित होते.

            उमरखेड येथे भेट व आढावा : उमरखेड येथील तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सर्व पॉझिटीव्ह रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरला दाखल करा. पॉझिटीव्हीटी दर पाच टक्यांपेक्षा कमी करणे व मृत्युदर 0.5 टक्के आणणे याला प्राधान्य द्या. यावेळी त्यांनी मरसूळ येथील कोव्हीड केअर सेंटर व उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

            बैठकीला उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कपाळे, ठाणेदार संजय चौबे आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी