जिल्हाधिका-यांची दारव्हा, दिग्रस, पुसद सीसीसी व प्रतिबंधित क्षेत्राला भेट

 



Ø कोवीड लस घेण्याचे आवाहन

Ø  सुट्टीच्या दिवशी अधिकारी 'ऑनफिल्ड'                           

             यवतमाळ 02 : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे व जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्याला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने सुट्टीच्या दिवशीही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आरोग्य यंत्रणा ऑनफिल्ड भेटी देऊन आढावा घेत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दारव्हा, दिग्रस आणि पुसद येथील कोव्हीड केअर सेंटर, लसीकरण केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रतिबंधित क्षेत्राला भेटी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तंरगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. हरी पवार व तालुकास्तरीय संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी प्रथम दारव्हा तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय येथील कोविड केअर सेंटरला तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच नगर परिषदेत बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यानंतर दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दिग्रस शहरातील शास्त्री वार्ड प्रतिबंधित क्षेत्र आणि कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णालयातील लसीकरणाचा आढावा घेतला.

दुपारच्या सत्रात त्यांनी पुसद शहरातील उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, प्रतिबंधित क्षेत्राला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी  यंत्रणेला कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करणे, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, कर्मचारी व दुकानदारांचे १००% लसीकरण पुर्ण करणे ,दैनंदिन माहिती ऑनलाईन अपलोड करणे व १००% डाटा एन्टी पूर्ण करणे, अशा सुचना दिल्या. सध्या ग्रामीण भागात ५५ लसीकरण केंद्र व शहरी  भागता ४० लसीकरण केंद्र सुरु असुन येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्याकरीता सर्व उपकेंद्र स्तरावर कोव्हीड लसीकरण सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

प्रत्येक कर्मचा-यांनी, प्रतिष्ठीत  नागरीकांनी , स्वयंसेवी संस्था, संघटना,यांनी लोकांना लस घेण्याकरीता प्रवृत्त करावे, अशा सुचनासुध्दा त्यांनी दिल्या.‍ प्रतिबंधित क्षेत्रात आय. एल. आय. व सारीचा नियमीत सर्व्हे करण्यात यावा व गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींनी नियमांचे तंतोतत पालन करावे. पॉझेटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांनी तात्काळ तपासणी करावी. आरोग्य, महसूल व इतर यंत्रणेने समन्वय ठेवून कामे करावी, असेही निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी दारव्हा उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पुसदचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, वैद्यकिय अधिक्षक अभय मांगे, तहसीलदार एस.आर.जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाडे, गटविकास अधिकारी राजु शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश खांदवे, दिग्रसचे तहसिलदार राजेश वजीरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, ठाणेदार सोनाजी आमले, तालुका आरोग्य अधिकारी कृष्णदास बानोत, गटविकास खरोडे, डॉ.संजय जाधव, डॉ.आर.डी.राठोड आदी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी