आरटीपीसीआर चाचणी रिपोर्टचा प्रलंबित आकडा शुन्यावर

 



Ø 24 तासात संबंधितांच्या मोबाईलवर पाठविला जातो अहवाल

       यवतमाळ, दि. 21 : नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावरसुध्दा रिपोर्ट लवकर मिळत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते, या बाबींची गंभीर दखल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली. चाचणीचा अहवाल लवकरात लवकर नागरिकांना कसा देता येईल, याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले. त्याचे फलित म्हणून आता 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तिचा चाचणी अहवाल मोबाईलवर पाठविला जात आहे. परिणामी प्रयोगशाळेत चाचण्यांचा प्रलंबित आकडा शुन्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.

लक्षणे असलेल्या किंवा पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हे कोरोनाविरुध्दच्या लढाईतील मुख्य शस्त्र आहे. मात्र चाचणीसाठी नमुने पाठविल्यावरसुध्दा अहवाल लवकर प्राप्त होत नसल्याने संबंधित व्यक्ती हा तोपर्यंत इतरांच्या संपर्कात येत असे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. या गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रयोशाळेत नमुने प्राप्त झाल्यानंतर 24 तासाच्या आत चाचणी अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली. 19 एप्रिलपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल लॅब) सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले. लॅबमध्ये नमुन्याची तपासणी झाल्यावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित नागरिकाला आता 24 तासाच्या आत चाचणी अहवाल उपलब्ध होत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यवतमाळ जिल्ह्यात नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळाच उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील सर्व नमुने नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स आणि अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे दोन - दोन आठवड्यानंतर अहवाल प्राप्त होत असे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नमुन्यांची जलदगतीने तपासणी होणे आवश्यक आहे. याच गरजेतून 2 जून 2020 रोजी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.

सुरवातीला या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी केवळ एकच मशीन उपलब्ध होती. त्यानंतर काही महिन्यांनी दुसरी मशीन आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे दोन मशीनसुध्दा कमी पडत होत्या. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी अमोल येडगे रुजू होताच त्यांनी प्रयोगशाळेत तीन अतिरिक्त मशीन उपलब्ध करून दिल्या. सद्यस्थितीत पाच मशीनच्या सहाय्याने प्राप्त नमुन्यांची 24 बाय 7 चाचणी करणे सुरू आहे. एका मशीनवर 24 तासात जवळपास 600 तपासण्या होत असून पाच मशीनमुळे दिवसाकाठी 3 हजार चाचण्या होत आहे. परिणामी प्रलंबित चाचणी अहवालाचा आकडा शुन्यावर आला आहे. यासाठी 11 टेक्निशियन कार्यरत आहेत. तसेच 3 जून 2020 पासून 20 एप्रिल 2021 पर्यंत या लॅबमध्ये आतापर्यंत 1 लक्ष 74 हजार 69 नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. विवेक गुजर यांनी दिली.

नागरिकांनीसुध्दा आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने पाठवितांना आपला योग्य मोबाईल नंबर यंत्रणेला द्यावा. जेणेकरून चाचणी अहवाल त्याच मोबाईलवर पाठविता येईल. तसेच अहवाल प्राप्त झाल्यावर व संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी