मदरसा आधुनिकीकरण अनुदानाकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि.21 (जिमाका): मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अनुदानाकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक मदरसांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. इच्छुक मदरसांनी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 30 जून 2023 अशी कळविण्यात आली होती. परंतु काही मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याची तारीख वाढवून देण्याबाबत केलेल्या मागणीनुसार या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास शासनाने मुदतवाढ देवून प्रस्ताव सादर करावयाची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 कळविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने अनुदान योजनेंतर्गत परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य तसेच स्विकारले जाणार नाहीत,असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले आहे. राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदारसा चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु हे विषय शिकविण्याकरिता शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान या बाबींकरिता अनुदान देण्यात येते. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डी.एड. बी.एड. शिक्षकांना मानधन अनुज्ञेय आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त प्रथम वर्षी 50 हजार रुपये त्यानंतर पाच हजार रूपये अनुदान देय आहे. तसेच पायाभुत सुविधांकारीता जास्तीत जास्त 2 लाख रुपये अनुदान देय आहे. पायाभुत सुविधांपैकी ज्या प्रयोजनाकरिता यापूर्वी अनुदान देण्यात आले आहे, त्या प्रयोजनाकरिता पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. ज्या मदरसांना केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरासांना अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही, असेही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे. या अनुदान योजनेबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१३१०१११२४६५५२११४ असा आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी