जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डोंगरगाव चुनखडी खानीबाबत जनसुनावणी

यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : प्रस्तावित डोंगरगाव चुनखडी खानीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली खानीच्या प्रस्तावित जागी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. नागरिकांना आपले म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची उत्तरे देण्यात आली. आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे प्रस्तावित डोंगरगाव चुनखडी खान डोंगरगाव, दहिगाव तालुका वणी आणि वेगाव तालुका मारेगाव येथील 552.36 हेक्टर क्षेत्रात एकूण 1.52 दशलक्ष टन त्यात चुनखडी 0.9 दशलक्ष टन, माती 0.06 दशलक्ष टन आणि ओली 0.56 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेच्या खाणीच्या प्रस्तावाची पर्यावरण विषयक जनसुनावणी आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनसुनावणीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, समन्वयक तथा उपप्रादेशिक अधिकारी भादुले, वणीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक, वणी तहसीलदार निखिल धुळधर, मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड, आरसीसीपीएलचे प्रकल्प प्रवर्तक, प्रकल्प व्यवस्थापकाचे अधिकारी, पर्यावरण सल्लागार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जनसुनावणीस नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षांच्यावतीने करण्यात आले होते. प्रकल्प प्रवर्तकांनी उपस्थित जनतेसमक्ष प्रकल्पाचे सादरीकरण केले. 252.56 हेक्टर क्षेत्राच्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन, पर्यावरण भौगोलिक परिस्थिती, प्रादेशिक भूविज्ञान खाणकामाचा प्रकार, जमिनीचा वापर, पाण्याचे निरीक्षण, ध्वनी निरीक्षण, वाहतूक अभ्यास, माती निरीक्षण, वनीकरण कार्यक्रम, पर्यावरणीय व्यवस्थापन योजना व कृती कार्यक्रम इत्यादीबाबत सादरीकरण करण्यात आले व प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मांडलेल्या मुद्द्यावर प्रकल्प प्रवर्तक यांनी उत्तरे दिली. त्यामध्ये प्रमुख मुद्दा स्थानिक लोकांना रोजगार मिळावा असा होता. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आपले काही म्हणणे असल्यास सादर करण्याचे आवाहन केले. उपस्थितांपैकी 17 नागरिकांनी आपले प्रश्न उपस्थित केले व त्यावर प्रकल्प प्रवर्तक यांनी उत्तरे सादर केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उत्तरे देण्यात आली. सायंकाळी सहा वाजतापर्यंत जनसुनावणी सुरु होती. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी