कारगील विजय दिवस उत्साहात साजरा वीरमाता,वीरनारींचा झाला सत्कार

यवतमाळ,दि.26 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने बुधवार दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात “24 वा कारगील विजय दिवस समारोह” उत्साहात साजरा करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे अध्यक्षतेखाली प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत बळीराजा चेतना भवन येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वीरमाता/वीरनारींना शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्ह्यातील वीरनारी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. प्रथमत: दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे तसेच व्यासपिठावर उपस्थितीत मान्यवरांचे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी “महाराष्‍ट्राचे महारथी” भाग 1-2 पुस्तकांचा संच व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सैन्यातील जवानांना नेहमीच प्रतिकुल परिस्थीतीशी सामना करावा लागतो. त्यांना दिलेली कामगिरी फत्ते करण्याचे कौशल्य हे त्यांना मिळालेल्या प्रशिक्षण आणि देशासाठी त्याग करण्याची भावना असते. असे सांगून कार्यक्रमाला उपस्थित एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यास प्रवृत्त केले. भविष्यात सैनिक अधिकारी/जवान होण्याची संधी तूम्हाला मिळणार आहे म्हणून आतापासूनच स्वयं शिस्त बाळगा आणि आपली स्वप्ने साकार करा, असे सांगितले. सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी सैनिक दरबाराच्या माध्यमातून, मेळाव्याचे आयोजन करुन तत्परतेने सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न केला जात असतो व भविष्यात सुध्दा केला जाईल याची ग्वाही दिली. आपल्या जिल्ह्याने यावर्षी 59 लाख 26 हजार 22 रुपये ध्वजदिन निधी संकलित केला असून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी उत्तम काम करत असल्याबाबत गौरवोद्गार काढले. अभ्यंकर कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ शाळेच्या संगीतचमुने स्वागतगीत प्रस्तुत केले. सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणाद्वारे कारगील विजय दिवस समारोहाचे महत्व व ऑपरेशन विजय कशा पध्दतीने व किती यशस्वीरित्या केले, याबाबत सभागृहाला माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वरिष्ठ लिपीक यशवंत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान अभ्यंकर कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संगीतचमुच्या देशभक्तीगीत सादरीकरणाने सभागृहाचे वातावरण देशभक्तीमय झाले होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी