आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि २५ (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध विभागाच्या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी 26 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अचलपूरचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वै.से. पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर, कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे शासनाद्वारे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरिक्षेकरिता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थीना दरमहा एक हजार रुपये दराने विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. या प्रशिक्षण कालावधीत अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज बुधवारी 26 जुलैपर्यंत कार्यालयाच्या पत्यावर सादर करावे. अर्जामध्ये स्वतः चे संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड http://rojgar.mahaswayam.in इत्यादी प्रती व एक स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी 27 जुलै रोजी मुलाखत घेण्यात येईल. उमेदवारांनी मुलाखतीकरिता मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी 28 जुलै रोजी कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणाच्या अटीनुसार उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा तसेच किमान वय 18 ते 30 चे दरम्यान असून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी केलेली असावी. शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी