कृषि स्वावलंबन : विहिरीसाठी २.५० लाखाचे अनुदान * विहीर दुरुस्ती व इनवेल बोअरसाठीही सहाय्य * सुक्ष्म सिंचन संच, ठिबक, तुषारसाठीही अनुदान

यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॅा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविली जाते. या योजनेतून नवीन विहीर बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जातात. जुन्या विहीरींची दुरुस्ती, शेततळ्यांचे अस्तरीकरण, ठिबक, तुषार व सुक्ष्म सिंचनाचा देखील लाभ योजनेतून दिला जात असल्याने शेतकऱ्यांना आपले शेत उत्पन्न वाढीसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यामार्फत राबविली जात आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर बांधकामासाठी शंभर टक्के म्हणजे २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्याकडे विहीर असेल आणि ती नादुरुस्त असल्यास केवळ दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयाचे अनुदान योजनेतून दिले जाते. योजनेतून शेतकऱ्यांना इनवेल बोअरिंग करावयाचे असल्यास २० हजार अनुदान दिले जातात. पंपसंचसाठी २० हजार, वीज जोडणी आकारसाठी १० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण करावयाचे असल्यास रुपये १ लाखाचे अनुदान देण्यात येते. सुक्ष्म सिंचन संचासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या दराने अनुदानाची तरतूद आहे. ठिबक सिंचनासाठी ५० हजार तर तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपयाचे अनुदान पात्र लाभार्थ्यांस दिले जाते. योजनेच्या लाभासाठी अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे. शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वत:च्या नावे ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर पर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नावे सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड आवश्यक. आधारकार्ड बॅंक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्यरेषेखालील लाभार्थ्यांस प्राधान्य दिले जाते. लाभार्थी दारिद्यरेषेखालील नसल्यास सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजाराच्या आत असावे. नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाच्या अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नवीन विहीरीसाठी यापुर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा. शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक पिके घेण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणे अतिशय महत्वाचे आहे. डॅा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेद्वारे सिंचन सुविधेसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आपले कृषि उत्पन्न वाढीसाठी मोलाची मदत झाली आहे. योजनेचा लाभ घेतलेले अनेक शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेऊ लागले असून हे या योजनेचे फलित आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी