मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्याच्या कामांना गती मिळणार ; जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा निश्चित करण्याचे निर्देश महावितरणच्या कामांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला आढावा

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्ह्यातील महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. याबैठकीत महावितरणचा कार्यकारी अभियंता संजय खंगार, अधिक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्यासह उपविभागाचे उपअभियंता उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा तालुकानिहाय आढावा घेतांना प्रकल्प उभारण्यासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये पुरेशाप्रमाणात शासकीय जागा उपलब्ध झाल्या आहेत. ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी खासगी जागा निश्चित करून प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषीपंप वीजजोडणी आणि पेडपेंडसीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला त्यावेळी जिल्ह्यातील पुसद, उमरखेड आणि महागाव उपविभागातील प्रलंबित कामांना गती देवून महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. वीजग्राहकांमध्ये वीजबिल भरण्याबाबत जनजागृती करून प्रोत्साहन द्यावे. यापूर्वी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी महिनाअखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचना श्री. येडगे यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॅार्मर) खराब होवून वीजपुरवठा खंडित होवू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून अतिरिक्त विद्युत रोहीत्र तयार ठेवावेत. रोहीत्रे खराब झाल्यास तात्काळ बदलून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा झाला पाहिजेत. ॲाक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विद्युत रोहीत्रे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी सर्वे करावे. यासर्व बाबींसाठी प्रभावी यंत्रणा उभी करुन आराखडा तयार करावा. अतिरिक्त रोहीत्र खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. यापुढील काळात विद्युत रोहीत्राबाबत अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीमार्फत आदिवासी विकास उपाययोजना व विशेष घटक योजनामध्ये मंजूर करण्यात आलेल्या विहिरींसाठी कृषीपंप वीज जोडणी प्राधान्याने द्यावीत. वीज जोडणी प्रास्तावांबाबत कृषी विभाग आणि महावितरणने बैठक घेवून प्रस्ताव मार्गी लावावेत. अतिवृष्टीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहण्याबाबत दक्ष राहावे. एमआयडीसी आणि पाणी पुरवठा योजनांना सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश देत शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी