जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी व आढावा

यवतमाळ, दि.25 (जिमाका) : जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज जिल्ह्यातील पुरपरिस्थिती व मदत वाटपाचा आढावा घेतला. बैठकीनंतर नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले. घरात पुराचे पाणी शिरल्याने पडझड झालेली घरे, खरडून निघालेल्या शेत जमिनी, शाळा, अंगणवाड्यांसारख्या शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यात पुर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची स्थिती संवेदनशिल आहे. प्रशासनाने शेती नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यानी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. तालुक्यातील कापरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्हाधिकारी पोहोचले. तेथील नुकसानग्रस्त शेती, पुल आदींची पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर तालुक्यातीलच लासिना येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मयंक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, तहसिलदार योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी