माझी कन्या भाग्यश्री : मुलींच्या नावे मुदतठेव गुंतवणूक Ø पालकांना 18 वर्षापर्यंत मुलीच्या खर्चाची चिंता नाही Ø एका मुलीवर 50 तर दुसऱ्या मुलीला 25 हजाराची ठेव

यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : प्रत्येकालाच वंशाचा वारसदार म्हणून आपल्या घरी मुलगा जन्माला यावा, असे वाटत असते. काहींना दोन्ही मुले, काहींना एक मुलगा एक मुलगी तर काहींना दोनही मुलीच जन्माला येतात. मुलगी जन्माला आल्यानंतर साहजिकच तिच्या भविष्याचा विचार तिच्या पालकांसमोर उभा राहतो. त्यामुळे केवळ मुली जन्माला येऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणाऱ्या पालकांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेने दिलासा दिला आहे. ठराविक कालावधीनंतर विशिष्ठ रक्कम मुलीला मिळणार असल्याने पालकांची चिंता मिटली आहे. मुलीच्या जन्मापासून तर तिचे शिक्षण व लग्नापर्यंत विविध प्रकारचा खर्च तिच्या आई वडिलांना करावा लागतो. आर्थिक कमकुवत असलेल्या पालकांना या खर्चाची तरतूद करतांना अनेक कष्ट करावे लागतात. त्यामुळे मुलगी जन्माला आल्या आल्या या योजनेच्या लाभासाठी तिची नोंदणी केली जाते. या योजनेंतर्गत एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांच्या मुलींना ठराविक कालावधीनंतर मुदतठेवीवरील व्याज व मुद्दल उपलब्ध करून दिले जाते. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यास 50 हजार रुपये मुलीच्या नावे मुदतठेव गुंतविण्यात येते. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दुसऱ्या मुलीच्या नावे 25 हजार मुदतठेव गुंतविण्यात येते. मुलीच्या जन्मानंतर सहाव्या वर्षी या गुंतवणुकीवरील केवळ अनुज्ञेय व्याज मुलीचा खर्च भागविण्यासाठी काढता येते. पुन्हा मुद्दल रक्कम गुंतवूण पुढील सहाव्या वर्षी म्हणजे मुलीच्या 12 व्या वर्षी अनुज्ञेय व्याज व पुढे पुन्हा मुद्दल गुंतवूण मुलीच्या 18 व्या वर्षी मागील सहा वर्षाचे व्याज व मुद्दल रक्कम काढता येते. या रक्कमेतून वयाच्या 18 वर्षापर्यंतचे तिचे खर्च भागविले जातात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळतो. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र जोडावे लागतात. त्यात दोनही मुलींचा जन्म तारखेचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख 50 हजाराच्या आतील असावे लागते. एका मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षाच्या आत व दोन मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन विहीत कालावधीत अर्ज अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा लागतो. अर्जासोबत दोन्ही मुली, आई व वडीलांचे आधारकार्ड, राशनकार्ड, बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत पात्र मुलगी व आईच्या नावाने संयुक्त खाते उघडून बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेचाही लाभ प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये उघडण्यात येते. त्यामुळे या योजनेंतर्गत एक लाख रुपयांचा अपघात विमा व 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्टचा लाभ घेता येतो. अनुज्ञेय लाभ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बॅंक बचत खात्यात दिला जातो. बॅंकेत खाते उघडण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका अर्जदारास सहाय्य करतात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी