महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील सर्व घटकांनी काम करण्याची गरज -ॲड. संगिता चव्हाण

यवतमाळ, दि ५ जुलै जिमाका :- महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होणे खपवून घेतले जाऊ नये. महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच महिलांना कामाच्या ठिकाणी, घरी आणि रस्त्यावर सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी शासन, प्रशासनासोबतच समाजातील सर्वच घटकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज जिल्ह्यातील महिलांविषयक प्रकरणांचा आढावा घेताना ॲड श्रीमती चव्हाण बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवनकुमार बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, कारागृह अधिक्षक किर्ती चिंतामणी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे तसेच सदस्य वर्षा शिरतुळे आणि संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. हरवलेल्या मुलींचा शोध पोलीस विभागाने प्राधान्याने घ्यावा हे सांगताना श्रीमती चव्हाण म्हणाल्या की,अशा मुलींवर अत्याचार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते तसेच मुलगी शाळेत एक दिवस जरी गैरहजर असल्यास शिक्षकांनी ताबडतोब त्यांच्या आई-वडिलांना कळवावे. ती का गैरहजर आहे याची विचारपुस करावी. जिल्ह्यात किती मुली हरवल्या आहेत त्याच्या आकडा देण्यात यावा असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बालविवाहाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असली तरी ऊसतोड कामगार दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी स्थलांतर करताना त्यांच्या किशोरवयीन मुलींना सोबत नेता येत नसल्यामुळे त्यांचे बालविवाह केले जातात. त्यामुळे जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच त्यांच्या किशोरवयीन मुले आणि मुलींना वस्तीगृहात ठेवण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांमधील बालविवाह थांबविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही त्या म्हणाल्या. कामाच्या ठिकाणी होणारा छळ व गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी शासकीय, नीमशासकिय कार्यालय तसेच खाजगी आस्थापनात स्थानिक अंतर्गत तक्रार समित्या गठित करण्यात याव्यात, या समित्या अद्यावत करून यांना बळकट करावे, असेही श्रीमती चव्हाण यांनी सांगितले. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी शौचालय असावे. तसेच प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी शौचालय, शौचालयाची स्वच्छता, सॅनिटरी व्हेंडिंग मशीन तसेच सीसीटीव्ही लावण्यात यावेत. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने काम करावे. त्यासोबतच प्रत्येक शहरात बाजारपेठ, बस स्थानक तसेच मुख्य चौकात महिलांसाठी शौचालये स्थापित करावी. शौचालयांची स्वच्छता ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक कार्यालयात हिरकणी कक्ष, महिलांसाठी चेंजिंग रूम असावी. त्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत जिल्ह्यात चार ठिकाणी समुपदेशन केंद्र, स्थापित आहेत मात्र जिल्ह्याचा विस्तार बघता प्रत्येक तालुक्याला एक समुपदेशन केंद्र असावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा महिला आयोग सुद्धा यासाठी पाठपुरावा करेल. सोबतच यवतमाळ जिल्ह्यात शिशुगृह देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. महिला आयोग यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना सुद्धा कौटुंबिक कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महिला लोकशाही दिनात यापुढे महिला कर्मचाऱ्यांचा विषय सुद्धा घेण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांच्या तक्रारींसाठी गुलाबी तक्रारपेटी ठेवण्यात यावी. तुझे पण त्यांच्यासाठी दवाखान्यात वेगळा वाढ असावा स्त्री-पुरुषांसारखा समान सन्मान त्यांना देखील मिळाला पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मोफत बियाणे देण्यात येत आहे. यात यावर्षी स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा पुढाकार घेतला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांसाठी यावर्षी 16 मोठे गोडाऊन दिलेले आहेत. महिला बचत गट धान्य खरेदी करून त्याची विक्री करण्याचे काम करतात. हे प्रत्येक प्रोजेक्टसाठी ८० लाखाचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच कुमारी मातांना सुद्धा त्यांच्या मागणी प्रमाणे लाभ देण्यात आला आहे. तसेच त्यांनाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी प्रशांत थोरात यांनी माहिलांवरील विविध विषयांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी