Ø 7745 बाधितांना मिळणार प्रत्येकी 5 हजाराचे अनुदान Ø जिल्ह्यात 3 कोटी 87 रुपयांचे अनुदान वाटप करणार Ø अडचण असलेल्या भागात टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवा Ø प्राथमिक माहितीनुसार 2 लाख 37 हजार हेक्टरचे नुकसान

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावात लाखो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान, अन्न धान्याचे वाटप आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे ‘युद्धस्तरावर’ चोवीस तासात करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्ह्यात पुरस्थितीने बाधीत 7 हजार 745 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 3 कोटी 87 लाख रुपयांचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याचा पालकमंत्री श्री.राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवन बनसोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयंक घोष, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातील पालकमंत्री श्री. राठोड यांनी संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागात शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत. पंचनामे करतांना दुरुस्त होऊ शकणाऱ्या आणि न होऊ शकणाऱ्या शेतजमिनी, पिकांचे नुकसान झालेल्या जमिनीच्या आणि घरांच्या पडझडीबाबत वेगवेगळ्या प्रकारात विभागणी करून पंचनामे करा. पूरग्रस्त कुटुंबांना ५ हजाराचे सानुग्रह अनुदान आणि अन्न धान्याच्या वाटपाला आजपासूनच सुरुवात करा. गावागावात टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवावे, रोगराई पसरू नये यासाठी फवारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. पुरात विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तके वाहून गेली. त्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करा, पुरात अनेकांचे महत्त्वाचे कागदपत्र वाहून गेले असून त्यांना पुन्हा मिळण्यासाठी शिबिरे आयोजित करावेत. नैसर्गिक आपत्तीमधील मृतांच्या वारसांना जाहीर मदतीचे वाटप करा, ग्रामीण रुग्णालयामध्ये ओपीडी सुरळीत सुरू ठेवा तसेच औषधसाठा उपलब्ध ठेवा, जनावरांना चारा उपलब्ध करा, अतिक्रमित घरांनाही 5 हजाराची मदत द्यावी, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे निर्देश देऊन नुकसानीचा शासनास अहवाल सादर करा, निधीची कमतरता पडू देणार नाही. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील शेती नुकसानीचे क्षेत्र प्राथमिक माहितीनुसार 2 लाख 37 हजार 814 हेक्टर असल्याचे सांगितले. खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्र 7 हजार 249 हेक्टर आणि 2 हजार 518 हेक्टर शेतीचे पंचनामे झाल्याचे सांगितले. या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी